उल्हासनगर, ता. १७ (वार्ताहर) : उल्हासनगरातील तरुण विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये रस्ते सुरक्षा जागरूकता वाढवण्यासाठी वाहतूक विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत ‘सडक सुरक्षा - जीवन रक्षा’ या विषयावर नारी गुरसहानी लॉ कॉलेज, उल्हासनगर ३ येथे जनजागृती कार्यशाळा घेतली. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उदाहरणांसह वाहतूक नियमांचे महत्त्व समजावून देण्यात आले. विशेषतः ब्लाइंड स्पॉट प्रात्यक्षिकाने ‘रस्त्यावर चुकीचे अनुमान म्हणजे जीवावर बेतलेला धोका’ हा संदेश प्रभावीपणे पोहोचवला.
उल्हासनगर वाहतूक विभाग आणि नारी गुरसहानी लॉ कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या कार्यशाळेत विद्यार्थ्यांपासून शिक्षकांपर्यंत सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाला वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त किरण बालवडकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश शिरसाठ; तसेच शांतता समिती सदस्य सुप्रिया कुलकर्णी उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत रस्ते सुरक्षेबाबत योग्य आणि आवश्यक माहिती दिली. तसेच जबाबदार नागरिक म्हणून वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमादरम्यान वाहतूक नियमांचे उल्लंघन, वेगमर्यादा न पाळल्यास होणारे अपघात, हेल्मेट-सीटबेल्टचे महत्त्व, तसेच मोबाईल वापरामुळे होणारा धोका याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेचे प्रमुख आकर्षण ठरले ते ‘ब्लाइंड स्पॉट’ प्रात्यक्षिक. वाहतूक विभागाच्या टीमने प्रत्यक्ष वाहनाच्या साह्याने चालकाला दिसत नसलेल्या धोकादायक कोनांचे प्रात्यक्षिक दाखवले. वाहनाजवळ उभे राहून विद्यार्थ्यांनी स्वतः हा अनुभव घेतल्यामुळे ब्लाइंड स्पॉट किती जीवघेणे ठरू शकतात हे प्रभावीपणे समोर आले. विद्यार्थ्यांनी यानंतर वाहतूक पोलिस दलासोबत मिळून सुरक्षितता मोहीम चालवण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रमाच्या शेवटी सुरक्षा शपथ देत सर्वांना वाहतूक नियम पाळण्याचे व इतरांनाही जागरूक करण्याचे आवाहन करण्यात आले.
नियमांचे पालन करा!
रस्ते अपघातांपैकी बहुतांश अपघात हे मानवी चुका आणि निष्काळजीपणामुळे घडत असल्याचे वाहतूक विभागाने यावेळी स्पष्ट केले. जागरूकतेने अशा घटना मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकतात, असा संदेश या कार्यशाळेतून देण्यात आला. युवकांनी पुढाकार घेऊन वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे ही सुरक्षित शहर निर्मितीसाठी अत्यंत गरजेची बाब असल्याचे यातून स्पष्ट झाले.
नारी गुरसहानी लॉ कॉलेजमध्ये घेतलेल्या ‘सडक सुरक्षा - जीवन रक्षा’ कार्यशाळेतून विद्यार्थ्यांनी वाहतूक नियमांचे महत्त्व अत्यंत गांभीर्याने समजून घेतले. विशेषतः ब्लाइंड स्पॉटचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांसाठी डोळे उघडणारा अनुभव ठरला. सुरक्षित शहरासाठी युवकांची जबाबदारी सर्वाधिक महत्त्वाची आहे. पोलिस दलाकडून सातत्याने जनजागृती करत राहू आणि उल्हासनगर अपघातमुक्त करण्यासाठी प्रयत्नशील राहू.
- राजेश शिरसाठ, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, उल्हासनगर वाहतूक विभाग