डॉ. घाणेकर नाट्यगृहाच्या दुरुस्तीचे काम हाती
डिसेंबरमध्ये होणार सुरुवात
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १७ : गेल्या काही दिवसांपूर्वीच ठाण्याच्या मध्यवर्ती भागात असलेल्या राम गणेश गडकरी रंगायतनच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून, नाट्यप्रेमींसाठी खुले करण्यात आले आहे. त्यानंतर डिसेंबर महिन्यापासून नाट्यगृह बंद न ठेवता डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी राज्य शासनाकडून पाच कोटींचा निधी मंजूर झाला आहे.
ठाण्यातील घोडबंदर परिसरातील हिरानंदानी मेडोज भागातील रसिकांसाठी नाट्यगृह असावे या दृष्टीने डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाची उभारणी करण्यात आली. हिरानंदानी विकसकाच्या माध्यमातून सुमारे ६० कोटी खर्चून घाणेकर नाट्यगृह बांधण्यात आले. २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी हे नाट्यगृह नागरिकांसाठी खुले करण्यात आले. मुख्य नाट्यगृहाची आसनक्षमता सुमारे एक हजार ९५ तर लघु नाट्यगृहाची क्षमता १८२ इतकी आहे. दरम्यान, १५ वर्षांतच डॉ. घाणेकर नाट्यगृहाच्या नूतनीकरण करण्याची वेळ आली आहे. राज्य शासनाने यासाठी तब्बल पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यानंतर आता डिसेंबरपासून या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. यामध्ये संपूर्ण वास्तूची डागडुजी, तुटलेल्या खुर्च्यां बदलणे, पडदे बदलणे, शौचालये दुरुस्ती, व्हीआयपी कक्ष दुरुस्ती, कार्पेट बदलणे, सुरक्षा कॅबिन दुरुस्ती, वातानुकूलित यंत्रणेची दुरुस्ती आणि इतर तांत्रिक व अंतर्गत सुविधांची सुधारणा करणे, आदी कामे केली जाणार असल्याची माहिती पालिका उपायुक्त उमेश बिरारी यांनी दिली.
आतापर्यंत तीन वेळा दुरुस्ती
लोकार्पणानंतर अवघ्या काही महिन्यांतच या नाट्यगृहाच्या प्लास्टर ऑफ पॅरिसचे छत २५ एप्रिल २०१२ रोजी रात्री कोसळले होते. त्यानंतर पालिकेने छताच्या दुरुस्तीचे काम सुरू केले. हे काम पूर्ण होण्यास दीड वर्ष लागल्याने त्या कालावधीत हे नाट्यगृह बंदच होते. या दुरुस्तीनंतर घाणेकर नाट्यगृह पुन्हा प्रेक्षकांसाठी खुले करण्यात आले, परंतु या नाट्यगृहातील लघु नाट्यगृहात गळती सुरू झाली होती. दुरुस्तीच्या कामासाठी लघु नाट्यगृह बंद ठेवण्यात आले होते. त्यातच आता पावसाळ्यात पुन्हा मुख्य छतातून पाणी गळती सुरू झाल्याने ती पालिकेने तात्पुरत्या स्वरूपात नाट्यगृह बंद न करता केली होती. वारंवार होणाऱ्या या दुरुस्तीमुळे नाट्यगृहाच्या बांधकाम गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह प्रश्न उपस्थित होत होते.