आरक्षण सोडतीवरून गोंधळ
महाविकास आघाडीचा ठिय्या, घोषणाबाजीतून निषेध
पनवेल, ता. १७ (बातमीदार)ः पालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी सुधारित आरक्षण सोडतीत राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) श्रेणीत १४ प्रभागांचा समावेश करण्यात आला, मात्र सुधारित आरक्षण प्रक्रिया पारदर्शक नसून सत्ताधाऱ्यांच्या फायद्यासाठी आखली गेल्याचा आरोप करत महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी जोरदार आक्षेप नोंदवित कार्यक्रमातच गोंधळ घातला.
पनवेल मनपा निवडणूक सुधारित सोमवारी पनवेलच्या वासूदेव बळवंत फडके नाट्यगृहात पार पडली. आरक्षण सोडतीच्या सुरुवातीपासूनच महाविकास आघाडीचे पदाधिकाऱ्यांना विरोध दर्शवत निर्दशने केली. सुधारित सोडत प्रक्रिया पारदर्शक नसून सत्ताधाऱ्यांच्या फायद्यासाठी असल्याचा आरोप करताना घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे सभागृहातील वातावरण चांगलेच तापले होते. माजी नगरसेवक, पक्ष पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी व्यासपीठाजवळ ठिय्या देत आरक्षण सोडत पारदर्शक नाही, लोकशाहीची पायमल्ली, निवडणूक आयोग जागा हो, अशा घोषणा देत सभात्याग केला.
-------------------------------
सोडत प्रक्रिया नियमानुसार
मनसेचे प्रवक्ते योगेश चिले, राष्ट्रीय काँग्रेसचे सुदाम पाटील, समाजवादी पार्टीचे अनिल नाईक, शेकापचे माजी नगरसेवक प्रकाश म्हात्रे, दीपक पाटील, ब्लॅक पॅंथरचे माजी उपमहापौर जगदीश गायकवाड उपस्थित होते. गोंधळाच्या वातावरणात आयुक्त मंगेश चितळे यांनी आरक्षण सोडत जाहीर प्रक्रिया पूर्ण केली. तसेच सोडत प्रक्रियेबाबत कोणाला काही हरकत असल्यास लेखी स्वरूपात निवडणूक प्रशासनाकडे तक्रार दाखल देण्याचे आवाहन केले.
-------------------------
पनवेल महापालिकेची सुधारित आरक्षण सोडत प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पूर्ण करण्यात आली आहे. कोणतीही हरकत असल्यास लेखी स्वरूपात प्रशासनाकडे सादर करावी; प्रत्येक हरकतीचा नियमांनुसार विचार केला जाईल.
- मंगेश चितळे, आयुक्त, पनवेल महापालिका
---------------------
सत्ताधाऱ्यांच्या राजकीय फायद्यासाठी सुधारित सोडत आखली गेली आहे. पारदर्शकतेचा पूर्ण अभाव असून, जनतेच्या निवडीवर गदा आणणारी ही प्रक्रिया मान्य करणार नाही. आम्ही आमच्या हरकती निवडणूक आयोगापुढे मांडणार आहोत.
- सुदाम पाटील, पनवेल शहर जिल्हाध्यक्ष काँग्रेस.