मुरबाड, ता. १७ (बातमीदार) : स्पार्क मिंडा फाउंडेशनच्या वतीने चालविण्यात येत असलेल्या आकर्षण कौशल्य विकास केंद्रामार्फत मुरबाड तालुक्यातील तरुण-तरुणींसाठी अल्प दरात विविध कौशल्यवर्धक अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवरच रोजगारक्षम प्रशिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे.
अभ्यासक्रमात कटिंग-टेलरिंग, ब्युटी पार्लर ॲडव्हान्स कोर्स, संगणकात टॅली, कॉम्प्युटर कोर्सेस, स्पोकन इंग्लिश, ब्युटी अँड वेलनेस, फॅब्रिक पेंटिंग आदी प्रशिक्षणांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कमी दरात कौशल्य शिक्षण मिळावे, हा या उपक्रमाचा हेतू असल्याचे संस्थेच्या प्रतिनिधी अश्विनी घोलप यांनी सांगितले. शहरी भागात महागडे शुल्क भरून हे अभ्यासक्रम शिकणे अनेक विद्यार्थ्यांना परवडत नाही. त्यामुळे फाउंडेशनने मुरबाडमध्येच हे अत्यंत परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून दिले आहेत. मुरबाड बसस्थानकासमोरील एमआयडीसी परिसरात हे कौशल्य विकास केंद्र चालवले जाते. आतापर्यंत या केंद्रात ६०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेतले आहे. कौशल्य विकासाबरोबरच स्पार्क मिंडा फाउंडेशन ग्रामीण भागातील नागरिकांसाठी नेत्रतपासणीचे उपक्रमही राबवते. संस्थेची अशीच कौशल्य केंद्रे महाराष्ट्रातील खेड-राजगुरुनगर, तामिळनाडू, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड येथेही कार्यरत आहेत. दिव्यांगांसाठी राबवलेल्या ‘सक्षम’ प्रकल्पाबद्दल फाउंडेशनचा सन्मान राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते केल्याची माहितीही अश्विनी घोलप यांनी दिली.