ठाण्यात गृहसंकुलांना कडक इशारा
सांडपाणी प्रक्रिया नसल्यास लाइन खंडित करणार ः प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अल्टिमेटम
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १८ : मोठ्या गृहसंकुलांत निर्माण होणाऱ्या सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार असून, त्याचबरोबर किती गृहसंकुलांत सांडपाण्यावर प्रक्रिया होते याचा आढावा घेण्यात येणार आहे. जे गृहसंकुल सांडपाण्यावर प्रक्रिया करीत नाही त्याची सांडपाण्याची लाइन खंडित करण्यात येणार असल्याचा इशारा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी दिला आहे. गेल्या काही महिन्यांपासून वाढते प्रदूषण रोखण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पावले उचलण्यास सुरुवात केली आले. अशातच मंगळवारी (ता. १८) ठाणे पालिकेच्या वतीने प्रदूषण रोखण्यासाठी काय उपाययोजना करण्यात येत आहेत याचा आढावा घेण्यात आला. त्या वेळी त्यांनी हा इशारा दिला. सांडपाण्यावर प्रक्रियेची जबाबदारी ही विकसकाबरोबर गृहसंकुलाची आहे. त्या अनुषंगाने हा निर्णय घेत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ठाणे महापालिकेकडून कचऱ्याचे वर्गीकरण होत नाही, हे खरे असले तरी कचरा वेगळा करून देण्याची जबाबदारी ही ठाणेकरांची असल्याचे सिद्धेश कदम यांनी सांगितले. शहर सुंदर करण्याची जबाबदारी ही प्रशासनाबरोबरच नागरिकांचीदेखील आहे. त्यामुळे आपल्या घरापासूनच प्रदूषण कसे कमी होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे. प्लॅस्टिकमुक्त राज्य करण्यासाठी आपल्यापासून सुरुवात करणे गरजेचे आहे. प्लॅस्टिक पिशवीचा वापर टाळून, कागदी किंवा कापडी पिशवीचा वापर करण्यावर भर देण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. दुकानदारांवर कारवाई करीन चालणार नाही, तर ज्या ठिकाणी प्लॅस्टिकच्या पिशव्या तयार होतात त्यांच्यावर कारवाई करावी लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
याशिवाय रुग्णालयांमध्ये तयार होणारा वैद्यकीय कचरा, सांडपाणी प्रक्रिया, पशुवैद्यकीय सुधारणा, घनकचरा व्यवस्थापन, हवेची गुणवत्ता सुधारणे इत्यादींसह इतर प्रदूषणाच्या अनुषंगाने असलेल्या घटकांचादेखील त्यांनी या वेळी आढावा घेतला.
ठाण्याची हवा बिघडली
ठाण्याची हवा सध्या बिघडलेली आहे. हवेचा गुणवत्ता निर्देशांक हा १२० एवढा असून, तो मध्यम स्वरूपाचा असल्याचे कदम यांनी स्पष्ट केले. हवा गुणवत्ता सुधारण्यासाठी आमचे प्रयत्न असणार आहेत. प्रत्येक शहरात ज्या ठिकाणी खाजगी किंवा शासकीय यंत्रणेची कामे सुरू आहेत त्यांच्या कामांच्या ठिकाणी हवा गुणवत्ता यंत्रणा बसविणे बंधनकारक केले आहे. अशा कामाच्या ठिकाणी हिरव्या रंगाची जाळी बसविण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत.
दोन महिन्यांनी संयुक्त बैठक
प्रदूषण रोखण्यासाठी ठाणे महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्यात दर दोन महिन्यांनी संयुक्त बैठक घेऊन प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना कशा पद्धतीने करता येऊ शकतात, याचे नियोजन आखण्याच्या सूचनाही त्यांनी या वेळी दिल्या.
अर्थसंकल्पात करणार तरतूद
ठाण्यातील प्रदूषण रोखण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहेत. यापुढे जाऊन महापालिकेच्या माध्यमातून आगामी अर्थसंकल्पात विशेष तरतूद केली जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली. यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडूनही सहाय्य मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.