ठाण्याच्या घाणेकर नाट्यगृहात गोंधळ
प्रियांका बर्वे यांचा कार्यक्रम पाडला बंद; आयोजकांचा आरोप
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १८ : बहुविकलांग मुलांच्या मदतीसाठी आयोजित संगीत कार्यक्रमादरम्यान काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात घडलेल्या हस्तक्षेपामुळे ठाण्यातील सांस्कृतिक वर्तुळात संतापाची लाट उसळली आहे. स्वयम पुनर्वसन केंद्रातर्फे रविवारी सुप्रसिद्ध गायिका प्रियांका बर्वे आणि सहगायक सौरभ दफ्तरदार यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सादरीकरण सुरू असतानाच पुढील नाट्यप्रयोगाच्या निर्मात्यांनी स्टेजवर धडक मारत कार्यक्रम तत्काळ थांबवण्यासाठी धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
आयोजकांच्या माहितीनुसार, नियोजित वेळ संपण्यापूर्वीच पुढील नाटकाचे निर्माते सतीश आगाशे आणि प्रशांत निगडे नाट्यगृह प्रशासनातील काही कर्मचाऱ्यांसह स्टेजवर गेले आणि त्यांनी ‘पडदा खाली टाकतो, कार्यक्रम थांबवा’ असा कलाकारांना धाक दाखवला. अचानक झालेल्या या हस्तक्षेपामुळे प्रेक्षकांमध्ये क्षणिक गोंधळ निर्माण झाला, तर कलाकार आणि आयोजकांना मोठा मानसिक धक्का बसला. स्वयम पुनर्वसन केंद्र हे भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाने मान्यता दिलेले ठाणे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र आहे. गेली २० वर्षे बहुविकलांग मुलांसाठी विविध सेवा विनामूल्य उपलब्ध करून देत आहे. या मुलांच्या उपचार व पुनर्वसनासाठी निधी उभारणीच्या उद्देशाने संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या कार्यक्रमातच असा अडथळा आणण्यात आल्याने शहरात सर्वत्र नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, ठाण्यासारख्या सांस्कृतिक परंपरेला जपणाऱ्या शहरात कलाकारांचा अशा स्वरूपात झालेला अपमान लज्जास्पद आणि निंदनीय असल्याची प्रतिक्रिया संस्थेकडून देण्यात आली. या प्रकरणाची पालिका आयुक्तांनी गंभीर दखल घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आयोजकांनी केली आहे.
..................................
कोट :
ठाणे हे सांस्कृतिक परंपरा जपणारे शहर आहे. बहुविकलांग मुलांसाठीच्या सामाजिक उपक्रमासाठी सुरू असलेल्या कार्यक्रमात बाहेरून आलेल्या कलाकारांना अपमानित करणे ही कोणती नवी परंपरा सुरू होत आहे? त्यामुळे आम्ही खूप व्यथित झालो आहोत. यापुढे बाहेरून सामाजिक कार्यक्रमासाठी नावाजलेले कलाकार कार्यक्रमासाठी येतील का, असा प्रश्न सतावत आहे.
- नीता देवळालकर, कार्यकारी विश्वस्त, स्वयंम पुनर्वसन केंद्र, ठाणे
................................
कार्यक्रमाची वेळे संपत आली असून कार्यक्रम वेळेवर संपवा, असे नाट्यगृह व्यवस्थापकांनी सांगितले. तसेच भैरवी झाल्यानंतर कार्यक्रम संध्याकाळी ७.४० वाजता संपला. त्यामुळे कुठेही कार्यक्रम बंद पाडल्याचा प्रश्न येत नाही.
- सतीश आगाशे, ‘माकडचाळे’ बालनाट्य निर्माते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.