कल्याण भाजपाच्या ‘रडारवर’
शिंदे गटावर ‘सर्जिकल स्ट्राईक’ची तयारी!
डोंबिवली, ता. १९ : डोंबिवलीत शिंदे सेनेच्या वजनदार पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये घेऊन भाजपने मोठा राजकीय धक्का दिल्यानंतर, आता हा ‘सर्जिकल स्ट्राईक’ कल्याण लोकसभा मतदारसंघाकडे वळला आहे. विश्वसनीय सूत्रांनुसार, कल्याणमध्येही भाजपचे ‘ऑपरेशन लोटस’ सक्रिय झाले असून, कल्याण पूर्व व पश्चिमेतील काही मोक्याचे पदाधिकारी भाजपने गळाला लावले आहेत. येत्या शनिवार-रविवारपर्यंत शिंदे सेना आणि ठाकरे गटाला मोठा हादरा मिळण्याची शक्यता आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघ हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा बालेकिल्ला आहे. याच गडात शिंदे सेनेची ताकद खिळखिळी करण्याचा चंग भाजपने बांधल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतले भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे ठाणे जिल्ह्याचा प्रभावक्षेत्र आल्यापासून राजकीय हालचालींना वेग आला आहे. वनमंत्री गणेश नाईक यांच्या माध्यमातून ठाण्यात उपमुख्यमंत्री शिंदे यांना घेरण्याचे राजकारण सुरू आहे, तर कल्याण लोकसभा क्षेत्रात स्वतः चव्हाण हे ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांवर दबाव वाढवत आहेत.
महायुतीमध्येच शिंदे यांच्या गडावर सुरुंग लावत भाजपने मोठ्या प्रमाणावर ‘इनकमिंग’ सुरू केले आहे. दीपेश म्हात्रे यांच्या प्रवेशानंतर महेश पाटील आणि डॉ. सुनिता पाटील यांचा भाजप प्रवेश शिंदे गटाच्या जिव्हारी लागला आहे. रवींद्र चव्हाण यांचे खंदे समर्थक असलेले महेश पाटील हे नोव्हेंबर २०२१ मध्ये भाजप सोडून शिवसेना (शिंदे गट) मध्ये गेले होते. पक्षातील विरोध आणि असहकार्यामुळे दुखावलेले पाटील यांनी आता पुन्हा ‘घरवापसी’ केली आहे. त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश करताना केलेल्या ‘भाजपमध्ये प्रवेश करत आहे’ या वक्तव्याचा जुना व्हिडिओ भाजपने आता व्हायरल केला आहे. महेश यांच्या भगिनी डॉ. सुनिता पाटील यांनी ‘मी कधीही शिवसेनेत प्रवेश केला नाही, भाजपपासून केवळ अलिप्त झाले होते, आता माझी घरवापसी झाली आहे,’ असे स्पष्ट केले आहे.
माजी नगरसेवकांच्या रांगा
शनिवारी (ता. २२) आणि रविवारी (ता. २३) कल्याण-डोंबिवलीत भाजपमध्ये मोठे ‘इनकमिंग’ होण्याची शक्यता असून, यात शिंदे गटातून कल्याण पूर्वचे माजी नगरसेवक नवीन गवळी व मल्लेश शेट्टी, तर ठाकरे गटातून कल्याण पश्चिमचे माजी नगरसेवक सचिन बासरे व त्यांचे बंधू सुधीर बासरे आणि माजी आमदार सुभाष भोईर यांसारख्या महत्त्वाच्या नेत्यांचा पक्षप्रवेश अपेक्षित आहे, ज्यामुळे दोन्ही शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
मनसेलाही फटका बसण्याची शक्यता
दिव्यातील शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष भोईर हेही लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. तसेच शिंदे सेनेचे डोंबिवली पश्चिमेतील आणि मनसेतील देवीचा पाडा परिसरातील पदाधिकारी भाजपच्या वाटेवर आहेत. शिंदे सेनेपाठोपाठ भाजपने आता मनसेच्या माजी नगरसेवकांनाही गळाला लावण्यास सुरुवात केली आहे. माजी नगरसेवक प्रकाश भोईर, माजी नगरसेविका सरोज भोईर, मंदा पाटील, कोमल पाटील, कस्तुरी देसाई हे भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. मनसेचे आमदार राजू पाटील यांचे खंदे समर्थक आणि उद्योजक काशिनाथ पाटील हेदेखील भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.