जय बजरंग कुस्ती आखाड्याचा मल्ल राष्ट्रीय स्तरावर चमकला
पैलवान यश ढाकणे याची जागतिक स्पर्धेसाठी निवड
टिटवाळा, ता. १९ (वार्ताहार) ः कल्याण पूर्व येथील जय बजरंग कुस्ती आखाड्याचा पैलवान यश ढाकणे याने राष्ट्रीय पातळीवर मोठी झेप घेत इतिहास रचला आहे. उत्तराखंडमधील देहराडून येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय ग्रेपलिंग कुस्ती स्पर्धेत ६६ किलो वजनी गटात यशने सुवर्णपदक पटकावले आहे. विशेष म्हणजे, या चमकादार कामगिरीमुळे यशची जागतिक ग्रेपलिंग स्पर्धेसाठी भारताच्या संघात निवड झाली असून, त्याला आंतरराष्ट्रीय कवाडे खुली झाली आहेत.
कल्याण-आडिवली परिसरातील रहिवासी श्याम ढाकणे यांचा मुलगा असलेला यश हा अत्यंत साध्या कुटुंबातील असून, वडील श्याम ढाकणे हे मूळचे नाशिक जिल्ह्यातील मौजे धुळवड या डोंगराळ भागातील आहेत. प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत त्यांनी ठाणे शहर पोलिस दलात पोलिस कॉन्स्टेबल म्हणून नोकरी मिळवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. आपल्या मुलाने मोठं व्हावं, कुस्तीच्या रिंगणात स्वतःचं स्थान निर्माण करावं, ही त्यांची इच्छा यशने प्रत्यक्षात उतरवली.
यशचे वडील श्याम ढाकणे म्हणाले की, हा प्रवास सोपा नव्हता, पण मुलाची चिकाटी, प्रत्येक वस्ताद आणि हितचिंतकांचे सहकार्य, कुटुंबाचा विश्वास यामुळेच आज हे यशाचे शिखर गाठले आहे. दरम्यान, यशचे लक्ष्य ऑलिंपिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकणे आहे. त्या ध्येयासाठी यश अविरत मेहनत घेत असून, त्याला कुटुंब, प्रशिक्षक आणि कुस्तीविश्वातील मान्यवरांचे भक्कम समर्थन मिळत आहे.
यशचा प्रवास
यशचा कुस्तीतील प्रवास २०२१-२२ मध्ये सुरू झाला. वस्ताद पैलवान प्रज्वलदीप ढोणे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदिवली, कल्याण पूर्व येथील जय बजरंग कुस्ती आखाड्यात त्याने पैलवानीचे धडे गिरवले. मुलाची जिद्द, असामान्य मेहनत आणि शिस्त पाहून वस्ताद प्रज्वलदीप ढोणे, किरण सोनवणे, रामदास उगले यांनी त्याच्या पुढील दर्जेदार प्रशिक्षणासाठी प्रयत्न सुरू केले. यशला सहा महिन्यांसाठी हरियाना येथील कोच जसबीर सिंग यांच्याकडे पाठवण्यात आले, तर नंतर त्याने तब्बल तीन वर्षे दिल्लीच्या नरेला येथील गुरू विरेंद्र कोच यांच्या मार्गदर्शनाखाली कसून सराव केला. सध्या यशचे प्रशिक्षण कोल्हापुरातील सेना केसरी पैलवान गुंडाजी पाटील यांच्याकडे सुरू असून, त्याच्या खेळात तांत्रिक पातळीवर मोठी प्रगती झाल्याचे जाणकारांचे मत आहे. राष्ट्रीय पातळीवर सुवर्ण कामगिरी करत यशने केवळ कल्याण-आडिवलीच नव्हेतर महाराष्ट्राचा मान उंचावला आहे. आता संपूर्ण प्रदेशाची नजर त्याच्या जागतिक स्पर्धेतील दमदार कामगिरीकडे लागली आहे.