अवजड वाहतुकीचा धोका
वाहनांना पूना लिंक रोडवर दिवसा बंदीची मागणी ः मनसेचा इशारा
कल्याण, ता. १९ (बातमीदार) : पूर्वेतील पूना लिंक रोडवरील काटेमानिवली टेकडी परिसरात दिवसभर अवजड वाहनांना बंदी घालण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. या मार्गावर मोठ्या संख्येने ट्रक आणि कंटेनर दिवसा धावत असल्याने वाहतूक ठप्प होते, तर या परिसरात अनेक शाळा आणि खाजगी क्लासेस असल्याने विद्यार्थ्यांचा मोठा राबता असतो. त्याचवेळी अवजड वाहनांची वर्दळ वाढल्याने अपघातांचाही धोका निर्माण होतो. याच मार्गावर यापूर्वी अनेक अपघात घडले असून, काहींना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे नागरिकांनी दिवसा अवजड वाहनबंदीची मागणी केली आहे.
विजयनगर मार्गावरील तीव्र उतारामुळे अवजड वाहनांचे ब्रेक फेल होण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. वेग नियंत्रणात राहण्यासाठी महापालिकेने काही दिवसांपूर्वी प्लॅस्टिक गतिरोधक लावले होते, परंतु ते २४ तासांतच फुटल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. आता या ठिकाणी मजबूत व टिकाऊ गतीरोधक बसविण्याचीही मागणी होत आहे. या प्रश्नावर मनसेसह विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी पुढाकार घेत पूना लिंक रोडवर दिवसा अवजड वाहनांना बंदी घालण्याची मागणी वाहतूक विभागाकडे केली आहे.
महत्त्वाचे ठिकाण असल्याने गर्दी
काटेमानिवली टेकडी परिसराला लागूनच विठ्ठलवाडी, कोळसेवाडी, हनुमान नगर, चिंचपाडा व चक्कीनाक्याकडे जाणारे प्रमुख रस्ते आहेत. या भागात वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यातच सहा ते सात शाळा व खाजगी क्लासेसच्या विद्यार्थी व पालकांचीही झुंबड असते. इतकेच नव्हे तर काही क्लिनिक, बँका व वित्तीय संस्थादेखील याच परिसरात आहेत, तर महापालिकेचे ‘ड’ प्रभाग क्षेत्र कार्यालय असल्याने नागरिकांचा राबता असतो.
रस्ता ओलांडण्यासाठी पुलाची मागणी
या परिसरात एकाच वेळी होणाऱ्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी होत असते. वाहनांमुळे विद्यार्थी, पालक व ज्येष्ठ नागरिकांना रस्ता ओलांडणे जिकरीचे बनते. याउलट पादचाऱ्यांमुळे चढावर अवजड वाहनांना ब्रेक मारावा लागतो. यामुळे मालवाहतूक करणाऱ्या वाहनांच्या क्लच प्लॅट जळून जातात. या सर्व बाबी लक्षात घेता स्थानिक माजी नगरसेवक नीलेश शिंदे यांनी रस्ता ओलांडण्यासाठी सोयीस्कर अशा पुलाची मागणी केली आहे, मात्र याबाबत फारशी कोणतीही चर्चा झाली नाही.
सात दिवसांनी मनसेची तोडफोड मोहीम
मनसेच्या शिष्टमंडळाने मंगळवारी (ता. १८) चक्कीनाका येथे वरिष्ठ वाहतूक पोलिस निरीक्षक सचिन सांडभोर यांना अवजड वाहतूक बंदीसंदर्भात निवेदन दिले असून, त्यांनी दिवसा ही वाहने बंद ठेवण्याची मागणी केली आहे. येत्या सात दिवसांत वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावला नाही, तर मनसे स्वतः रस्त्यावर उतरून या अवजड वाहनांच्या काचा फोडेल, असा इशारा मनसेचे उपशहरप्रमुख योगेश गव्हाणे यांनी दिला आहे, तर मनसेने काच नसलेले खेळण्यातील अवजड वाहनही पोलिसांना भेट दिले आहे.
वाहतूक विभाग व महानगरपालिकेची भूमिका
मनसेच्या पत्रावर वाहतूक विभागाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून, पुढे काय कार्यवाही होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे, तर महानगरपालिकेने आठवडाभरात या रस्त्याचे डांबरीकरण व गतिरोधक टाकण्याचे काम केले जाणार असल्याचे सांगितले आहे.