विकासात धारावी कोळीवाड्याचे अस्तित्व राहणार का?
कोळी समाजाचा तीव्र आंदोलनाचा इशारा
धारावी, ता. १९ (बातमीदार) : धारावी पुनर्वसन प्रकल्प गेल्या २१ वर्षांपासून रखडला आहे. यामध्ये धारावी कोळीवाड्याला न्याय मिळावा, यासाठी कोळी समाज आक्रमक झाला आहे. धारावी कोळी जमात ट्रस्टतर्फे यासंदर्भात धारावी कोळीवाडा येथे पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांसोबत संवाद साधला. या वेळी ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारने कोळीवाड्यासाठी न्याय्य भूमिका न घेतल्यास उग्र आंदोलन उभारण्याचा इशारा दिला.
या वेळी धारावी कोळी जमात ट्रस्टचे अध्यक्ष डॉमनिक कोळी, सचिव दिगंबर चंद्रकांत कोळी, सदस्य जोसेफ कोळी, देवयानी कोळी, मोनिका कोळी आदी सदस्य उपस्थित होते. मुंबईतील भूमिपुत्र असलेल्या कोळी समाजाचे मुंबई विकासात अनेकदा नुकसान झाले आहे. धारावीलगत असलेल्या सायन कोळीवाडा याचा बळी दिला गेला आहे. तशीच परस्थिती धारावीत निर्माण झाली आहे. धारावी पुनर्वसन प्रकल्पात धारावी कोळीवाड्याला वगळले असल्याचे सरकारने सांगितले आहे, मात्र यावर कोळी समाज साशंक आहे.
कोळीवाड्याच्या अनेक जागांवर सरकारने अतिक्रमण केले आहे. त्यामुळे कोळी समाजाचे मोठे नुकसान झाले असल्याचे या वेळी सांगितले. धारावीतील ५२ एकर जमीन कोळी समाजाची आहे, मात्र त्यातील अनेक जागांवर अतिक्रमण झाले आहे.
पुनर्वसन प्रकल्प झोपडीधारकांसाठी असल्याचे शासनाने जाहीर केले आहे. त्यात कोळीवाड्याचे अस्तित्व पुसले जाऊ नये, अशी आशा या वेळी व्यक्त करण्यात आली. धारावी बचाव आंदोलनासोबत असल्याचे सांगण्यात आले. ज्यांच्यासाठी हा प्रकल्प आहे. तो त्यांच्यासाठी शासनाने राबवावा. आमचा विकासाला विरोध नसल्याचे सांगण्यात आले.
काय आहेत मागण्या?
१. महाराष्ट्र सरकारने भूमी अभिलेख विभागाच्या वतीने २०१८ मध्ये केलेले धारावी कोळीवाड्याचे बाह्य सिमांकन अद्याप अंतिम केले नाही. ते त्वरित अंतिम करावे.
२. धारावी पुनर्वसन प्रकल्पात कोळीवाड्याचे क्षेत्रफळ चुकीचे दाखवले आहे. त्याची दुरुस्ती करण्यात यावी.
३. म्हाडाच्या वतीने १९९० मध्ये खोटी आश्वासने भूमिपुत्रांना देऊन समाजाच्या मासे सुकवण्याची व वहिवाटेच्या जागेत इमारती बांधल्या व कोळी समाजाला वंचित ठेवले त्याचा खुलासा केला जावा.
४. कोळी समाजाच्या जागांवर फसवणूक करणे थांबले पाहिजे. याचा समाजाकडून विरोध आहे.