भिवंडी, ता. १९ (बातमीदार) : शहरात व परिसरात मिळून अल्पवयीन मुलांचे बेपत्ता होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. तीन दिवसांत वेगवेगळ्या भागांतून पाच मुले बेपत्ता झाल्याने शहरातील अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेच्या परिस्थितीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दरम्यान, पोलिसांनी सर्व प्रकरणांमध्ये अपहरणाच्या आरोपाखाली गुन्हे दाखल केले असून तपास सुरू आहे.
शहारातील बालाजीनगर परिसरात पहिली घटना १७ नोव्हेंबरला सायंकाळी घडली. तेथे १५ वर्षांचा मुलगा शिकवणीसाठी घराबाहेर पडला; पण घरी परतला नाही. रात्री उशिरापर्यंत शोध घेतल्यानंतर कुटुंबाने भोईवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. कुटुंबाचा असा दावा आहे की एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या मुलाला फसवून पळवून नेले. दुसरी घटना अंजुरफाटा परिसरात घडली, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १५ नोव्हेंबरला दुपारी २ ते ४ च्या दरम्यान १५ वर्षांचा मुलगा बेपत्ता झाला. नारपोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या दोन घटनांव्यतिरिक्त, कोनगाव पोलिस ठाण्याच्या परिसरातून १५ वर्षांची एक मुलगी बेपत्ता झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही मुलगी नेहमीप्रमाणे गोदामात काम करण्यासाठी गेली होती; पण ती घरी परत आली नाही. पोलिसांनी शोध घेतला असता ती आसिफ नावाच्या तरुणासोबत गेल्याचे त्यांना आढळले. कुटुंबाने तक्रार दाखल केली असून, आसिफ तरुणाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. नारपोली पोलिस परिसरात आणखी एक गुन्हा समोर आला आहे. त्यानुसार एका अज्ञात व्यक्तीने १४ वर्षांच्या मुलीला फसवले. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. सोमवार १७ नोव्हेंबरला देवजीनगरच्या खासगी शाळेत गेलेल्या १३ वर्षाच्या मुलीच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन तिला पळवून नेल्याची तक्रार चरणीपाडा येथे राहणाऱ्या पालकांनी नारपोली पोलिस ठाण्यात केली आहे.
विशेष पथके तैनात
तीन दिवसांत पाच अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याने शहरातील पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, सर्व प्रकरणांची गांभीर्याने चौकशी केली जात असून, मुलांना लवकरात लवकर शोधण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. दरम्यान, शहरातील वाढत्या घटना लक्षात घेता, नागरिकांनी मुलांचे संरक्षण करण्यासाठी पोलिस गस्त वाढवण्याची आणि देखरेख व्यवस्था मजबूत करण्याची मागणी केली आहे.