‘आयएनएस माहे’ लवकरच नौदलाच्या ताफ्यात
‘आत्मनिर्भर भारत’च्या दिशेने मोठे पाऊल
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : भारतीय नौदलाच्या तटीय सुरक्षेला नवे बळ देणारी आणि पाणबुडीविरोधी कारवाईसाठी खास तयार करण्यात आलेली स्वदेशी शॅलो वॉटर क्राफ्ट ‘आयएनएस माहे’ येत्या सोमवारी (ता. २४) मुंबईतील नेव्हल डॉकयार्डमध्ये औपचारिकरीत्या नौदलात दाखल होणार आहे. कोचीन शिपयार्ड लिमिटेडने बांधलेल्या माहे श्रेणीतील ही पहिली युद्धनौका असून, आठ नौकांच्या मालिकेला सुरुवात करणारा हा महत्त्वाचा क्षण मानला जात आहे.
आयएनएस माहे ही आकाराने ‘कॉम्पॅक्ट’ असली तरी तिची क्षमता अत्यंत प्रभावी आहे. कमी पाणलोट असलेल्या भागातही ही नौका उत्कृष्ट वेगाने आणि चपळाईने हालचाल करू शकते. पाणबुडी शोध व नष्ट करणे, किनारपट्टीची सतत गस्त, समुद्री दळणवळण मार्गांचे संरक्षण आणि तातडीच्या कारवायांना प्रतिसाद ही तिची प्रमुख कामे असतील. नौदलातील तज्ज्ञांच्या मते, तटवर्ती सुरक्षेत माहे निर्णायक भूमिका निभावू शकते. या नौकेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिच्या बांधणीत ८० टक्क्यांहून अधिक स्वदेशी घटकांचा वापर झाला आहे. भारतीय बांधणी, नेव्हिगेशन प्रणाली, सेन्सर्स आणि शस्त्रसज्जता यांचा एकत्रित परिणाम म्हणून ‘आत्मनिर्भर भारत’च्या दिशेने समुद्री क्षेत्रातील हे मोठे पाऊल ठरते. माहे हे नाव मलबार किनाऱ्यावरील ऐतिहासिक किनारी गावावरून देण्यात आले असून, तिच्या अधिकृत चिन्हात ‘उरुमी’ हे कलारीपयट्टूमधील लवचिक परंतु घातक तलवारशस्त्र दाखवण्यात आले आहे. हे चिन्ह नौकेची गती, अचूकता आणि निर्णायक प्रहारक्षमता दर्शवते.
किनारपट्टी सुरक्षेचे जाळे होणार मजबूत
नौदलाच्या मते, माहे श्रेणीतील नौका ही नव्या पिढीची, वेगवान, तंत्रज्ञानसंपन्न आणि पूर्णपणे भारतीय क्षमतेवर आधारित कॉम्बॅटन्ट प्लॅटफॉर्म आहे. तिच्या ताफ्यातील समावेशाने भारतीय नौदलाची तटवर्ती पाणबुडीविरोधी क्षमता अधिक सक्षम होणार असून, किनारपट्टी सुरक्षेचे जाळे आणखी मजबूत केले जाईल.
‘आयएनएस माहे’ची वैशिष्ट्ये
- ८० टक्के स्वदेशी घटकांपासून बांधणी
- कमी पाणलोटातही वेगवान हालचाल
- अत्याधुनिक सेन्सर्स व नेव्हिगेशन
- आधुनिक शस्त्रसज्जता
- निर्मिती : कोचीन शिपयार्ड लिमिटेड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.