स्मार्ट-नेव्ह तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कॉक्लिअर इम्प्लांट
सायन रुग्णालयात अडीच वर्षांच्या मुलीवर यशस्वी शस्त्रक्रिया
भाग्यश्री भुवड, सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : मुंबई महापालिकेच्या सायन रुग्णालयात कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक ‘स्मार्ट-नेव्ह’ तंत्रज्ञानाचा पहिल्यांदाच वापर करण्यात आला असून, या तंत्रज्ञानामुळे शस्त्रक्रियेदरम्यान एक्स-रेची आवश्यकता पूर्णपणे टळली आहे. इम्प्लांट अचूक जागी बसला आहे की नाही, हे प्रत्यक्ष शस्त्रक्रियेच्या वेळीच स्क्रीनवर दिसत असल्याने रेडिएशनचा धोका नाही, तसेच सुमारे अर्धा तास ते चाळीस मिनिटे एवढा वेळही वाचत आहे. कॉक्लिअर कंपनीच्या सीआय-५२२ इम्प्लांटसाठी विकसित केलेले हे तंत्रज्ञान ऑक्टोबरपासून उपलब्ध असून, सायन रुग्णालयाने नुकतेच हे उपकरण खरेदी केले आहे. केईएमनंतर हे तंत्रज्ञान वापरणारे महापालिकेचे दुसरे रुग्णालय ठरले आहे.
या शस्त्रक्रियेसाठी आतापर्यंत सी-आर्मद्वारे एक्स-रे काढून इम्प्लांटची स्थिती तपासावी लागत असे. त्यासाठी ऑपरेशन थिएटर रिकामे करणे, रेडिएशनपासून बचावासाठी लेड एप्रन वापरणे आणि योग्य अँगल मिळवण्यासाठी अनेकदा शूट्स घ्यावे लागत होते. या प्रक्रियेमुळे वेळ वाढत असे. आता स्मार्ट-नेव्हमुळे इम्प्लांट कॉक्लियामध्ये कोणत्या गतीने आणि किती हळूवारपणे जात आहे हे रिअल-टाइम स्क्रीनवर दिसते. सर्व २२ इलेक्ट्रोड योग्य स्थितीत आहेत की नाहीत, शॉर्ट किंवा ओपन सर्किटची शक्यता आहे का, याचे निर्देशकही त्वरित दिसतात. ‘ऑटो- एनआरटी’ सुविधेमुळे नसांच्या प्रतिक्रियेची तपासणीही जलद गतीने होते.
सायन रुग्णालयात पहिली लाभार्थी अडीच वर्षांची आदिशा
डोंबिवलीतील आदिशा शेख ही सायन रुग्णालयात स्मार्ट-नेव्ह तंत्रज्ञानासह कॉक्लिअल इम्प्लांट घेणारी पहिली बालरुग्ण ठरली. जन्मत:च श्रवणदोष असलेल्या आदिशाची अडीच वर्षांच्या वयात ही शस्त्रक्रिया करण्यात आली. ‘श्रव्या कॉक्लिअर इम्प्लांट’ योजनेअंतर्गत तिचा इम्प्लांट पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध झाला. तपास, कागदपत्रे, एमआरआय-सीटी चाचण्या ते पोस्ट-ऑपरेटिव्ह थेरपीपर्यंत सर्व सुविधा सामाजिक कार्य विभागाच्या माध्यमातून कमी किंवा शून्य खर्चात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
शस्त्रक्रियेतील टीम
ही शस्त्रक्रिया डॉ. क्षितिज शाह (प्राध्यापक, ईएनटी) यांनी सर्जरी केली. त्यांना डॉ. मनीष प्रजापती (सहाय्यक प्राध्यापक, ईएनटी) यांची साथ होती. विभागातील डॉ. अनघा जोशी (प्राध्यापक, ईएनटी), डॉ. रेनुका ब्राडो (प्राध्यापक व विभागप्रमुख, ईएनटी) यांनीही मार्गदर्शन केले. भूलतज्ज्ञ विभागातील डॉ. कंचन रुपवटे आणि डॉ. शीतल नायक यांनी भूल व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.