नवीन वर्ष, थर्टी फर्स्टसाठी एफडीए सक्रिय
खवय्यांना निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ विकणाऱ्यांना तंबी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : थर्टी फर्स्टचा जल्लोष, नवीन वर्षांचे स्वागत यात जनतेसह पर्यटक व्यस्त असतात. थर्टी फर्स्ट अन् नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी बहुतांश लोक हाॅटेल, रेस्टॉरंटमध्ये चमचमीत पदार्थांवर ताव मारतात; मात्र हाॅटेल, रेस्टॉरंटमध्ये येणाऱ्या ग्राहकांना निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ दिल्याचे निदर्शनास येताच संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिला. दरम्यान, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या संकल्पनेतून ‘‘स्वागत नववर्षाचं, संकल्प हॉटेल स्वच्छतेचा’ विशेष अभियान ३१ डिसेंबरपर्यंत राज्यभर राबविण्यात येणार आहे.
२५ डिसेंबरपासून ख्रिसमस सुरू होत असून, ३१ डिसेंबर रोजी २०२५ या वर्षाला निरोप देण्यासाठी थर्टी फर्स्ट आणि २०२६ या नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटक ३१ डिसेंबर रोजी रात्रभर जल्लोष करतात. ३१ डिसेंबर हा दिवस १ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा केला जातो. या दिवशी नागरिक मोठ्या प्रमाणात हॉटेल, रेस्टॉरंट या ठिकाणी जाऊन अन्नपदार्थांचा आस्वाद घेत असतात. मोठ्या प्रमाणात अन्नपदार्थांची मागणी वाढते. ग्राहकांना निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ दिले जाऊ नयेत, यासाठी एफडीएच्या माध्यमातून विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. ही मोहीम शहरासह ग्रामीण भागातील तालुका स्तरावरील उपहारगृह व हॉटेलांसाठी राबविण्यात येणार आहे. मंत्रालयात अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली अन्न व औषध प्रशासन विभागाची आढावा बैठक झाली. या बैठकीत विभागाचे आयुक्त श्रीधर डुबे पाटील, सहआयुक्त (दक्षता) डॉ. राहुल खाडे, सहआयुक्त (अन्न) मंगेश माने उपस्थित होते.
...................................
अशी होणार कारवाई
या अभियानात आवश्यकतेनुसार अन्नांचे नमुने घेतले जातील. त्रुटी आढळल्यास, हॉटेलला तत्काळ सुधारणा नोटीस आणि कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येईल. विनापरवाना चालणाऱ्या आस्थापनांवर तत्काळ कारवाई होईल. नोटीस मिळाल्यानंतर १५ दिवसांनी फेरतपासणी केली जाईल. सुधारणा न करणाऱ्या हॉटेलचा परवाना तत्काळ निलंबित किंवा रद्द करण्यात येईल, असा इशारा मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.