मतांसाठी भाजप काहीही करायला तयार
आमदार रईस शेख यांची टीका; उरणमध्ये उर्दू प्रचार पत्राचे वाटप
भिवंडी, ता. २२ (वार्ताहर) : भाषा कोणत्याही एका धर्माची नसते. ज्या उर्दू भाषेला तुम्ही एवढ्या शिव्या देता, त्याचा वापर उरणमध्ये तुम्ही प्रचारासाठी करता, अशी खोचक टीका समाजवादी पार्टीचे भिवंडी पूर्वेचे आमदार रईस शेख यांनी उरण नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपाकडून केल्या जाणाऱ्या उर्दू प्रचार पत्रावर केली आहे.
रायगड जिल्ह्यातील उरण नगरपरिषदेच्या निवडणुकीत प्रचारासाठी भाजपकडून शुक्रवारी (ता. २१) सभेचे आयोजन करण्यात आले होते. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शोभा कोळी शहा, प्रभाग क्रमांक २ मधील उमेदवार पानसरे शशिकांत संदीप आणि रोशनी सचिन तेली यांच्या प्रचारासाठी ही सभा होती. या प्रचारासाठी भाजपकडून उर्दू भाषेमध्ये प्रचारपत्र छापण्यात आले आहे.
भाजपच्या या उर्दू प्रचार पत्रावर समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख यांनी भाजपने आता उर्दूमध्ये प्रचार सुरू केला आहे. हा मनोरंजक बदल आहे. या नवीन ''उर्दू प्रचारा''वर मंत्री नितेश राणे यांची भूमिका काय असेल हे पाहण्याची मला उत्सुकता आहे, अशी टीका एक्सवर केली आहे.
रईस शेख पुढे म्हणाले की, उर्दू भाषा कोणत्या धर्माची नाही. उर्दूचा जन्म कोठे झाला, त्याचा वापर कोणता समाज करतोय याचे ज्ञान टीका करणाऱ्यांनी करून घेण्याची गरज आहे. सिंध प्रांताची उर्दू भाषा असून या भाषेचा वापर तेथील हिंदू व पंजाबी लोक करतात. महाराष्ट्रात दख्खनमध्ये उर्दू शायर होते. उर्दू भाषेची प्रतिमा मलिन करून तिला एका धर्माशी जोडून खूप लोकांनी वाईट केले आहे.
मुंबईमध्ये उर्दू लर्निग सेंटर बनवण्यात येत होते, ज्याचा उद्देश उर्दू सोबत मराठी शिकवण्याचा होता. त्याला विरोध करून ते बंद करण्याचे काम नितेश राणे यांनी केले. त्यासाठी त्यांनी आंदोलन केले. त्यासाठी उर्दू भाषा मुस्लिमांची आहे, असे वातावरण निर्माण केले. आता त्या नेत्यांची व भाजपा वरिष्ठ नेत्यांची उरणमधील मतांसाठी भाजपच्या उर्दू प्रचार पत्रावर त्यांची भूमिका काय आहे हे मला जाणून घ्यायला आवडेल," अशी खोचक प्रतिक्रिया देत त्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले.
भाषांना धार्मिक रंग देऊ नका
आमदार शेख यांनी भाषांना धार्मिक रंग देणे बंद करण्याची मागणी केली. भाजपला यश मिळत आहे, त्याची वेगवगेळी कारणे आहेत. दहा हजार देता, एसआरए आणता, संविधानात नसलेल्या गोष्टी करून सत्तेवर येता. पण सत्य हे आहे की तुम्ही फक्त मतांचे राजकारण करता हे उरणमधील उर्दू प्रचार पत्रातून दिसून येत आहे," असे परखड मत समाजवादी पार्टीचे भिवंडी पूर्वेचे आमदार रईस शेख यांनी व्यक्त केले.