परवानगीशिवाय वाढीव बांधकामाची विकसकाला परवानगी
पालिकेचा कारभार चर्चेत; रद्द करण्याची रहिवाशांची मागणी
कल्याण, ता. २२ (वार्ताहर) : कल्याण पश्चिमेतील एका सोसायटीच्या परवानगीशिवाय महापालिकेने विकसकाला इमारतीवर आणखी एक मजला वाढविण्याची परवानगी दिली आहे. सहा मजल्यांची ही इमारत कमकुवत झाली असून, बांधकाम करताना एखादी दुर्घटना झाल्यास याची जबाबदारी पालिका घेणार आहे का, असा सवाल नागरिकांनी करीत बांधकाम परवानगी रद्द करण्याची मागणी पालिकेकडे केली आहे.
कल्याण पश्चिमेतील गोदरेज हिल परिसरात नीरज रिवेरिया शंतनू को-ऑप. हाउसिंग सोसायटी आहे. २०१७ साली या सहामजली इमारतीचे बांधकाम झाले होते. अवघ्या आठ वर्षांतच इमारत कमकुवत झाली असून, दरवाजाच्या चौकटी निघत असल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे. अशात विकसकाला या इमारतीवर आणखी एका मजल्याचे वाढीव बांधकाम करण्यासाठी पालिकेने परवानगी दिली आहे. येथील सोसायटीची परवानगी तसेच ना-हरकत प्रमाणपत्र नसतानादेखील पालिकेने पाचवा मजला अधिक सातवा मजला असा एक मजला वाढविण्याची परवानगी दिली आहे. यामुळे या रहिवाशांनी या अजब कारभाराबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे.
तत्कालीन आयुक्त विजय सूर्यवंशी, नगररचनाकार सावंत यांचे सोसायटीचे ना-हरकत पत्र प्राप्त होत नाही तोपर्यंत बांधकाम परवानगी देणार नाही, असे मौखिक आणि लेखी आदेश नमूद असतानाही पालिकेकडून परवानगी कशी देण्यात आली, असा सवाल रहिवाशांनी उपस्थित केला आहे.
माहिती घेऊन सांगू
ही सोसायटी नोंदणीकृत असताना विकसकाने खोटा ना-हरकत दाखला देऊन पलिकेची दिशाभूल केल्याचा आरोप सोसायटीच्या सचिव रेश्मा बांगर यांनी केला आहे. याबाबत आयुक्तांचीदेखील या रहिवाशांनी भेट घेतली असून, याबाबत माहिती घेऊन सांगू, असे उत्तर देत आयुक्तांनी नगररचना विभागाकडे जाण्यास सांगितले. दरम्यान, नगररचना विभाग आपल्या परवानगीवर ठाम आहे.