कल्याण-डोंबिवलीत स्वच्छतेचा नवा अध्याय
शहरातील कचरा ठिकाणांचे सुशोभीकरण सुरू
कल्याण, ता. २२ (वार्ताहर) : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून स्वच्छतेसाठी विविध उपाययोजना केल्या जातात. यानुसार महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून शहरात वारंवार कचरा पडणारी ठिकाणे स्वच्छ करून सुशोभित करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. त्यासाठी महापालिका परिक्षेत्रातील नागरिकांनी सार्वजनिक वा खासगी जागी, रस्त्यावर कचरा न फेकता केवळ महापालिकेच्या घंटागाडीमध्येच देण्याचे आवाहन घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी केले आहे.
शहरातील काही ठिकाणांवर पडणाऱ्या उघड्या कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. तसेच शहराचा चेहराही विद्रूप होतो. त्यावर आता घनकचरा व्यवस्थापन विभागाने शक्कल लढवत स्वच्छ राखण्याच्या दृष्टीने एक मोहीम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत कल्याण पश्चिमेतील बारावे जलशुद्धीकरण केंद्र परिसर, बारावे गाव या दोन आणि ठाकुर्ली पूर्वेच्या स्टेशन रोड परिसरात एका ठिकाणाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. कल्याणातील तीन प्रभागांत महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांमार्फत तर उर्वरित सात प्रभागांमध्ये सुमित एल्कोप्लास्ट कंपनीच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात येत आहे. या ठिकाणांवर आकर्षक रांगोळ्या, भित्तीचित्रे, जुन्या टायरमध्ये सजवलेल्या रंगीत कुंड्या ठेवणे, शोभेची झाडे आणि छोटेखानी हिरवळ असे सुशोभीकरण केले जाणार आहे.
रात्रीच्या सत्रातही घंटागाडी
कल्याण-डोंबिवलीत आता रात्रीच्या सत्रात महापालिकेकडून घंटागाडी पाठवण्यात येत आहे. यामुळे रस्त्यावर पडणारा कचरा बंद होईल. आगामी काळात सर्वच कचऱ्याची ठिकाणे बंद करून त्यांचे सुशोभीकरण करून संपूर्णपणे कचरामुक्त केली जाणार आहेत. त्यासाठी नागरिकांनी घरातील कचरा वर्गीकरण करून केवळ घंटागाडीमध्येच देण्याचे आवाहनही रामदास कोकरे यांनी केले आहे.