वाडा, ता. २१ (बातमीदार) : नगरपंचायतीच्या निवडणुकीत शुक्रवार (ता. २१) उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार रिद्धी भोईर आणि रंजिता पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. याव्यतिरिक्त नगरसेवकपदाच्या सहा अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली.
वाडा नगरपंचायत निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदासाठी सात वैध उमेदवारी अर्ज दाखल होते. त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार रिद्धी भोईर व रंजिता पाटील, तसेच अपक्ष उमेदवार ज्योती आघाव या तिघींनी अर्ज मागे घेतल्याने आता नगराध्यक्ष पदाकरिता चार उमेदवार रिंगणात राहिले आहेत. १७ प्रभागांमध्ये नगरसेवक पदाकरिता ७४ वैध उमेदवारी अर्ज होते. त्यापैकी सुनिता जाधव (प्रभाग क्रमांक २), रोहन पाटील (प्रभाग १०), कुणाल साळवी (प्रभाग १२), अजहर शेख (प्रभाग १३), ज्योती आघाव (प्रभाग १५), विराज पाटील (प्रभाग १६) यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे १७ प्रभागांत ६८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आपले बळ कोणाच्या पाठीशी उभे करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.