उलवेत पेट्रोलचा काळाबाजार
दुचाकीचालकांना जास्त दराने विक्री
उलवे, ता. २३ (बातमीदार) ः परिसरातील काही सेक्टरमध्ये पेट्रोलची अधिकृत दरांपेक्षा ३० ते ३५ रुपये जास्त दराने पेट्रोल विक्री केली जात आहे. पोलिस, प्रशासनाच्या नजरेआड हा प्रकार सुरू असल्याने स्थानिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
काही झोपड्यांमध्ये किंवा छोट्या दुकानांच्या आडोशाला प्लॅस्टिक कॅन, बाटल्या किंवा लहान टाक्यांमध्ये पेट्रोल साठवून त्याची विक्री केली जाते. रहिवासी परिसरात हा प्रकार होत असल्याने मोठ्या दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही. अधिकृत पेट्रोल पंप रहिवासी भागांपासून लांब असल्याने काही मंडळी अडचणींचा गैरफायदा घेत आहेत. तर बेकायदा पेट्रोल विक्रीने सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
-----------------------------
प्रशासनाचे दुर्लक्ष
वर्षभरापूर्वी बेकायदा पेट्रोल साठवणूक करणाऱ्या दुकानात भीषण स्फोट झाला होता. त्या दुर्घटनेत तीन ते चार जणांचा मृत्यू झाला होता. तर आसपासच्या परिसराचे मोठे नुकसान झाले होते; पण प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.