मुजोर अधिकाऱ्यांना वठणीवर आणणे गरजेचे
खासदार म्हस्के यांची सूचना
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २६ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आतापर्यंत भारतीय रेल्वे एकीकडे प्रगती करीत आहे. दुसरीकडे मात्र सर्वसामान्य लाखो प्रवाशांना मस्तवाल अधिकाऱ्यांमुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. असे काही मुजोर अधिकारी केबिनमध्ये बसून असतात. अशा देशभरातील मुजोर अधिकाऱ्यांना वठणीवर आणणे गरजेचे असल्याचे ठाणे लोकसभा खासदार नरेश म्हस्के यांनी मंगळवारी दिल्लीत झालेल्या रेल्वेच्या सल्लागार समितीच्या एका बैठकीत ठणकावले. या वेळी म्हस्के यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासमोर ठाणे लोकसभा मतदारसंघातील रेल्वेस्थानकांमधील प्रलंबित विकासकामे, ठाणे-मुलुंड स्थानकांदरम्यानच्या नवीन रेल्वेस्थानकाच्या कामात होत असलेल्या दिरंगाईबद्दल खंत व्यक्त केली.
पुढे बोलताना म्हस्के यांनी ठाणे स्थानकात मुलुंडकडे जाणारा नवीन पादचारी पूल त्वरित बांधण्याची आवश्यकता आहे. हा पूल प्लॅटफॉर्म क्रमांक १ला प्लॅटफॉर्म क्रमांक ७ आणि ८ शी जोडेल. तसेच स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिम बाजूंना जोडेल. यामुळे प्रवाशांची गर्दी नियंत्रित करण्यात आणि त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यात मोठी मदत होईल. ठाणे रेल्वेस्थानकातील फलाट क्रमांक ७, ८ आणि ९, १० येथे एक्सलेटरची उभारणी करणे गरजेचे आहे. भाईंदर रेल्वेस्थानकातून चर्चगेटकडे जाणाऱ्या लोकलची संख्या वाढविणे, दादर रेल्वेस्थानकातून पश्चिम रेल्वेने जोधपूर येथे जाण्यासाठी वंदे भारत ट्रेन सुरू करणे, अजमेर सुपरफास्ट एक्स्प्रेस दररोज सोडण्यात यावी, जोधपूर आणि जयपूर येथे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना भाईंदर येथे थांबा द्यावा, भाईंदर स्थानकात नव्याने होत असलेल्या फलाटाची रुंदी १० मीटरने वाढविण्यात यावी, मिरा रोड स्थानकात तिकीट खिडकीची संख्या वाढविण्यात यावी, पनवेल ते नवी मुबंई आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान विशेष लोकल सुरू करणे, सार्वजनिक शौचालयांची नियमित स्वच्छता राखणे, त्यांची संख्या वाढविणे, ठाणे लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सर्व रेल्वेस्थानकांत वन रुपी रुपये क्लिनिक सुरू करणे, पादचारी पूल, लिफ्ट, एक्सलेटरची संख्या वाढविणे अशा विविध आग्रही मागण्या या बैठकीत केल्या.
तसेच सिडको प्रशासनाने नवी मुंबईमधील रेल्वेस्थानकांची निर्मिती केली आहे, तर रेल्वे प्रवासी सेवा मध्य रेल्वे देत आहे. या दोन्ही प्राधिकरणांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने कित्येक वर्षे येथील रेल्वेस्थानकांची सुधारणाच झालेली नाही. स्थानकांतील दुर्दशेमुळे प्रवाशांना नाहक गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची विनंती म्हस्के यांनी केली.
खासदार संजय पाटील, सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांनीसुद्धा खासदार नरेश म्हस्के यांनी महाराष्ट्रातील रेल्वेविषयक मांडलेल्या सूचना, मागण्यांना पाठिंबा देत मागण्या लवकरात लवकर सोडविण्याची विनंती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.