रुळालगत ७,८२५ अनधिकृत झोपड्या
माहीम-वांद्रा आगीने रेल्वेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; मोठी दुर्घटनेची भीती कायम
नितीन बिनेकर ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : रेल्वे रुळाशेजारी उभ्या राहिलेल्या अनधिकृत झोपड्या आता फक्त अतिक्रमणाच्या चौकटीत बसत नाहीत, तर त्या उपनगरीय रेल्वेची संपूर्ण सुरक्षा व्यवस्था गिळंकृत करणाऱ्या जिवंत ज्वालामुखीत परावर्तित झाल्या आहेत. आजमितीस उपनगरीय रेल्वे रुळांलगत ७,८२५ झोपड्यांनी रेल्वे रूळ व्यापलेले आहेत.
गेल्या शनिवारी माहीम ते वांद्रेदरम्यान रेल्वे रुळालगतच्या झोपडपट्टीत भीषण आग लागली होती. ही आग रुळांना चिकटलेल्या झोपड्यांमध्ये पसरताच हार्बर मार्गाची वाहतूक तीन तास बंद पडली आणि हजारो प्रवासी अडकून पडले. एका छोट्याशा घटनेने हे शहर आणि उपनगरीय रेल्वे किती असुरक्षित आहे, याची झटकन जाणीव करून दिली.
लोहमार्ग पोलिसांच्या सर्वेक्षणानुसार मध्य आणि पश्चिम मार्ग मिळून ७,८२५ झोपड्या रुळाशेजारी उभारल्या गेल्या आहेत. त्यापैकी ५,७८४ मध्य रेल्वेवर तर १,९५२ पश्चिम रेल्वेवर आहेत. अनेक रचना इतक्या जवळ आहेत, की चालत्या गाडीच्या खिडकीबाहेर हात काढला तर झोपडीची भिंत थेट हाताला लागेल.
रेल्वेला लागून असलेल्या वस्त्या
कुर्ला, मानखुर्द गोवंडी, चुनाभट्टी, जीटीबी नगर, वांद्रे पूर्व, जोगेश्वरी, गोरेगाव, बोरिवली आणि दहिसर ही ठिकाणे तर अक्षरशः धोक्याची वस्ती बनली आहेत. रुळाशेजारील या झोपड्यांतून रेल्वेला दररोज मिळणारे ‘गिफ्ट’ म्हणजे ट्रॅकवर टाकलेला कचरा, तुटलेल्या बाटल्या, दगडफेक, उघडी तार आणि बेढब रचना. उपनगरीय मार्गांवरील झोपड्यांचा हा अनधिकृत विस्तार रेल्वेची सुरक्षा, गाड्यांची नियमितता, देखभाल आणि विकासकामांसाठी मोठा अडथळा ठरत आहे.
सर्वेक्षण झाले, इशारे दिले
मार्च २०१८मध्ये लोहमार्ग पोलिसांनी फोटो आणि तपशिलांसह संपूर्ण अहवाल मध्य आणि पश्चिम रेल्वेला दिला होता. बांधकामे रुळांना चिकटली आहेत, लगेच कारवाई करा, असा स्पष्ट इशारा देण्यात आला होता. तरीही मोठ्या स्तरावर कोणतीही निर्णायक कारवाई झाली नाही. उलट झोपड्यांची संख्या वाढतच गेली. माटुंगा, दादर, विक्रोळी, गोरेगाव, मालाड आणि दहिसर या परिसरात परिस्थिती इतकी गंभीर बनली आहे, की रेल्वेच्या दैनंदिन कामांसाठीही जागा उरत नाही. रेल्वेला विकासकामे करायची असतात, पण रुळाशेजारील झोपड्यांचा हा विळखा कोणताही प्रकल्प अडकवतो.
आगीने दाखवलेले वास्तव
माहीम–वांद्रे झोपडपट्टीत शनिवारी दुपारी साडेबारा वाजता अचानक आग लागलेल्या आगीने रेल्वेच्या विद्युत यंत्रणा धोक्यात आल्या आणि हार्बर मार्गावरील गाड्या थांबवाव्या लागल्या. तज्ज्ञांच्या मते, झोपड्यांमधील बेढब वायरिंग, गॅस सिलिंडरांचा अनियमित वापर, अरुंद जागा आणि दाट वस्ती यामुळे छोटा स्पार्कही मोठ्या घटनेत बदलू शकतो. सिलिंडर स्फोटाचा धोका कायम आहे. यापूर्वी अंधेरी स्थानकालगतच्या झोपडपट्टीत अनेक वेळा भीषण आगी लागल्या आहेत. एकदा ही आग अंधेरी स्थानकापर्यंत आली होती. यापासून धडा घेत प्रशासनाने अंधेरी रेल्वेस्थानकांतर्गत उभ्या असलेल्या झोपड्या पूर्णपणे हटवल्या आहेत.
अतिक्रमण हटवणे आता अपरिहार्य
उपनगरीय रेल्वेची सुरक्षा सुनिश्चित करायची असेल तर रुळाशेजारील अतिक्रमण हटवणे हा एकमेव मार्ग उरतो. रेल्वे पोलिस आणि स्थानिक प्रशासनाने संयुक्त कारवाई न केल्यास अशा घटना पुन्हा घडणार हे निश्चित.
रुळाशेजारील झोपड्या हा केवळ अतिक्रमणाचा मुद्दा नाही, तर प्रवासी सुरक्षेला थेट धोका आहे. शनिवारची आग ही फक्त चेतावणी नव्हती. ती ‘शेवटची घंटा’ होती, असे अनेक प्रवासी स्पष्टपणे सांगत आहेत.
पाच वर्षांत रेल्वेची कारवाई
मध्य रेल्वे
मार्च २०२१ - भायखळा : ६० झोपड्या हटवल्या
ऑक्टोबर २०२२ - दादर-कुर्ला : १२० अतिक्रमणे
नोव्हेंबर २०२३ - चुनाभट्टी - जीटीबी नगर : १६५ अतिक्रमणे
नोव्हेंबर २०२३ - जुई नगर - सानपाडा : १५ अतिक्रमणे
जानेवारी २०२४ - वडाळा - जीटीबी कॉरिडॉर : ४५ अतिक्रमणे
ऑगस्ट २०२४ - मानखुर्द - गोवंडी : ७० झोपड्या
मार्च २०२५ - मानखुर्द - गोवंडी : ३५ - ४० अतिक्रमणे
पश्चिम रेल्वे
जुलै २०२१ - अंधेरी - जोगेश्वरी : ३५ अतिक्रमणे
डिसेंबर २०२२ - बोरिवली - कांदिवली : ५५ झोपड्या
ऑगस्ट २०२३ - दहिसर - मिरा रोड : ५० झोपड्या
डिसेंबर २०२३ - बांद्रा टर्मिनस : ३० अतिक्रमणे
फेब्रुवारी २०२४ - कांदिवली - मालाड : ६० अतिक्रमणे
नोव्हेंबर २०२४ - बांद्रा पूर्व (गरीबनगर) : ४५ झोपड्या
एप्रिल २०२५ - बोरिवली ते दहिसर : ८० अतिक्रमणे
मे २०२५ - दहिसर - बोरिवली : ४३ झोपड्या
रेल्वे रुळांवर उभ्या केलेल्या या बेकायदा झोपड्यांना पाठबळ देणाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी अराजकता लोकल आणि प्रवाशांच्या सुरक्षेला थेट धोका बनली आहे. रोजचे लाखो जीव धोक्यात टाकणाऱ्यांची जबाबदारी ठरवणे अनिवार्य आहे.
- वंदना सोनावणे,
अध्यक्षा, महाराष्ट्र महिला प्रवासी संघटना
रेल्वे रुळांवर एवढ्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढणे, हे थेट प्रशासनाच्या निष्क्रियतेचे परिणाम आहे. कायद्यात स्पष्ट अधिकार असूनही झोपड्या हटत नाहीत, हे धोकादायक आहे. प्रवाशांची सुरक्षा धोक्यात टाकणाऱ्या या प्रणालीगत अपयशाची तातडीने चौकशी झाली पाहिजे.
- सचिन मौर्या,
रेल्वे प्रवासी
रुळालगतच्या मोठ्या आगीच्या घटना (२०११-२०२५)
* नोव्हेंबर २०२५
माहीम स्थानकालगतच्या धारावीतील नवरंग कम्पाउंड झोपड्यांना आग
* ऑक्टोबर २०१७
वांद्रे स्थानकाला लागून असलेल्या गरीबनगर व बेहरामपाडा झोपडपट्टीत लागलेली आग स्कायवॉक व तिकीट खिडकीपर्यंत पोहोचली
* जानेवारी-२०१७
मस्जीद बंदर स्थानकाच्या पूर्व भागातील झोपडपट्टी आग
* मार्च- २०१४
जीटीबी नगर रेल्वेस्थानकाच्या रुळालगतच्या झोपड्या जळाल्या
* मार्च- २०११
वांद्रे स्थानकाच्या गरीबनगर झोपडपट्टीला आग, हजारो झोपड्या जळाल्या