पालघर, ता. २५ (बातमीदार) : नगर परिषदेची स्थापना होऊन २७ वर्षे उलटली तरी पालघर शहरामध्ये अनेक नागरी समस्या आहेत. भाजी व मच्छी मार्केट नाही, रस्त्यांची दुरवस्था झाली असून काही भागांत अजूनही पुरेसे पिण्याचे पाणी नाही. सुशोभीकरणाचा थांगपत्ता नाही, तर काही प्रभागांत गटारातील पाणी रस्त्यावर येते. मतदानासाठी प्रत्येक प्रभागातील इच्छुक उमेदवार मतदारांशी संवाद साधताना या समस्यांकडे नागरिक लक्ष वेधत आहेत. त्यामुळे नागरी समस्यांमुळे पालघर नगर परिषदेची निवडणूक चांगलीच गाजणार आहे.
पालघर नगर परिषदेची स्थापना सप्टेंबर १९९८मध्ये झाली. या २७ वर्षांच्या काळात बहुसंख्य काळ शिवसेनेची सत्ता होती. याव्यतिरिक्त काही वर्षे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचीही सत्ता होती. या काळात शहराचा विकास आराखडा तयार करण्यात आला, मात्र त्याच्यामध्ये अनेक त्रुटी असल्याने त्याला विरोध झाला. त्यांच्यात काही सुधारणा करण्यात आली, मात्र या विकासकामांची अंमलबजावणी सत्ताधारी लोकप्रतिनिधी तसेच सध्याच्या प्रशासनाला करता आली नाही.
पालघर शहरातील मुख्य रस्त्यांवर व्यापारी, दुकानदार, फेरीवाल्यांनी अतिक्रमण करून आपले प्रस्थ निर्माण केले आहे. त्यामुळे शहरामध्ये दररोजचीच कोंडी होते. सर्वसामान्य लोकांना आज हा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याच्या दुतर्फा पदपथांवर झालेल्या अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालावे लागते. त्यामुळे काही वेळेला अपघातही घडत आहेत. या निवडणुकीत नव्याने निवडून येणारे सदस्य याकडे लक्ष देतील का, म्हणून मतदार आज त्यांच्याकडे पाहात आहेत.
स्वच्छतागृहांअभावी कुचंबणा
पालघर शहर जिल्ह्याचे ठिकाण आहे. त्यामुळे अन्य तालुक्यांतील कामासाठी येणारे नागरिक व औद्योगिक परिसर असल्याने गुजरात व इतर राज्यांतून येणारे नागरिक पालघर शहरात येतात. शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहे नाहीत. त्यामुळे पर्यटकांची कुचंबणा होते.
आठवडा बाजारामुळे कोंडी
पालघर रेल्वेस्थानकापासून ते माहीम रोड ७० गाळ्यांपर्यंत शुक्रवारचा बाजार भरतो. या दिवशी शहरात कोंडी होते. कारण बाजार रस्त्याच्या दुतर्फा भरतो. हा बाजार माहीम रोड रस्त्याच्या आयसीआयसी बँकेच्या पुढे बाजार भरण्यास परवानगी दिली होती, मात्र आज पालघर रेल्वे स्थानकापासून बाजार भरत असल्याने मुंबईकडे किंवा गुजरातकडे जाणाऱ्या चाकरमान्यांना शुक्रवारी खूपच त्रास होतो. यावर प्रशासनाने आजपर्यंत कोणतीच कारवाई केली नाही.
पाण्याची समस्या गंभीर
नगर परिषद क्षेत्रामधील भागात लोकसंख्या वाढत असताना पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था केलेली नाही. भविष्यासाठी अधिक पाणी मिळण्यासाठी सरकारकडे प्रस्ताव व मागणी करणे आवश्यक असतानाही लोकप्रतिनिधींनी याकडेही लक्ष दिलेले नाही. आजही गावपाड्यांना पुरेसे पाणी मिळत नाही. प्रचारासाठी जाणाऱ्या उमेदवाराला पाणी कधी देणार म्हणून नागरिक विचारत आहेत.
रस्त्यांची दुरवस्था
पालघरमधील मुख्य रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट आहे. रस्त्यावर मोठे खड्डे पडलेले आहेत. धुळीचे साम्राज्य पसरले आहे. वाहतुकीमुळे धूळ घरे, दुकानांमध्ये पसरत आहे. पादचाऱ्यांना श्वसनाचा त्रास होत आहे. मुख्य रस्त्यांचे सुशोभीकरण नाही, पण रस्ते दुरुस्तही केले जात नाहीत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.