रोह्याच्या विकासासाठी युतीला विजयी करा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन; सर्वांगीण विकासासाठी निधी देऊ
रोहा, ता. ३० (बातमीदार) : रोह्यात बदल हवा असेल तर शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवारांना मोठ्या बहुमताने विजयी करा. कोणाच्या दहशतीला घाबरण्याची गरज नाही, तुमच्या पाठीशी भरत आहेत, महेंद्रशेठ आहेत आणि मी स्वतः एकनाथ शिंदे आहे, अशा ठाम शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रोहेकरांना आवाहन केले.
रोहा नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजप युतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शिल्पा अशोक धोत्रे तसेच नगरसेवकपदाच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित रॅलीदरम्यान ते बोलत होते. रॅलीची सुरुवात ग्रामदैवत श्री धावीर महाराजांच्या दर्शनाने झाली. त्यानंतर धावीर मंदिर ते फिरोज टॉकीज नाका, तीन बत्ती नाका, मुख्य बाजारपेठ, श्रीराम मारुती चौक असा उत्साहपूर्ण मार्गक्रमण करत बाळासाहेब ठाकरे चौकात रॅलीची सांगता झाली. रॅलीमध्ये मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, तालुकाप्रमुख ॲड. मनोजकुमार शिंदे, भाजप तालुकाध्यक्ष अमित घाग, उमेदवार शिल्पा धोत्रे आणि सर्व नगरसेवकपदाचे उमेदवार तसेच शेकडो नागरिकांनी उपस्थिती लावली. उपमुख्यमंत्री शिंदे आपल्या भाषणात म्हणाले, मी नगरविकास खात्याचा मंत्री आहे; त्यामुळे रोह्याच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. लाडकी बहीण योजना सुरू केली असून ती कोणीही बंद करू शकत नाही. रोह्यातील बहिणी-भावांना आता खरा बदल हवा आहे आणि हा बदल घडवण्यासाठी युतीचे उमेदवार निवडून येणे गरजेचे आहे. ते पुढे म्हणाले, की राज्यातील आरोग्य मंत्रीही आपलेच आहेत. त्यामुळे रोह्यात आधुनिक, सुसज्ज रुग्णालय उभारले जाईल. याशिवाय रस्ते, शुद्ध पाणी, सांडपाणी व्यवस्था, तसेच प्रदूषणमुक्त कुंडलिका नदी यांसारख्या मूलभूत समस्या प्राधान्याने सोडविण्यात येतील.
...................
गोगावले रोह्याचे पालकत्व स्वीकारणार
रोहा नगर परिषदेसाठी या निवडणुकीत मंत्री भरत गोगावले आणि आमदार महेंद्र दळवी यांनी जीव ओतून काम केल्याचे शिंदे यांनी नमूद केले. युती सत्तेत आल्यानंतर गोगावले रोह्याचे पालकत्व स्वीकारणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले. भरतशेठचा रुमाल कमाल करून दाखविल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत त्यांनी रोहेकरांमध्ये निवडणूक उत्साह अधिक पेटवला. रोह्याच्या सर्वांगीण विकासाचा नवा अध्याय सुरू करण्यासाठी शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी करताच उपस्थित जनसमुदायाकडून जोरदार प्रतिसाद मिळाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.