तीन वेळा नगरसेवक तरी नाव गायब
सुधीर भगत यांचे नाव वगळल्याने जितेंद्र आव्हाड यांची जिल्हाधिकाऱ्यांवर टीका
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ४ : शहरातील तीन वेळा नगरसेवक राहिलेले सुधीर भगत यांचे नावच मतदानानंतर यादीतून गायब असल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. भगत कुटुंबाचे मुंब्रा परिसरातील दीर्घ सामाजिक कार्य सर्वपरिचित आहे. इतकेच नव्हे तर त्यांच्या वडिलांच्या नावावर ‘रामचंद्र नगर’ हा संपूर्ण परिसर ओळखला जातो, असे असताना आगामी निवडणुकीपासून रोखण्यासाठीच ही संगनमताने केलेली कारवाई असल्याचा आरोप शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक्स या समाजमाध्यमावरून केला. तसेच निवडणूक अधिकारी-कर्मचारी यांच्या मिलापातून नाव वगळण्याची प्रक्रिया करण्यात आली असून, ती उघड झाल्याचेही त्यांनी सांगितले.
गेल्या काही महिन्यांपासून वोट चोरीवरून विरोधकांनी रान उठवले आहे. अशातच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावलेल्या सुधीर भगत यांचे नाव मतदार यादीतून गायब झाल्याची बाब समोर आली आहे. यासंदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले की, जिल्हाधिकारी जे जिल्ह्याचे मुख्य निवडणूक अधिकारीही आहेत. त्यांनी तक्रारीवरील निकालात अधिकाऱ्यांकडून अनावधानाने झालेली चूक, असे मान्य केले आहे. तसेच १ जुलैपूर्वी यादीत नाव समाविष्ट करता येणार नाही; त्यामुळे ना मतदान करू शकत, ना निवडणूक लढवू शकत. पुढील दाद योग्य प्राधिकरणाकडे मागावी, असे सांगत जिल्हाधिकाऱ्यांनी हात झटकल्याचेदेखील त्यांनी या वेळी सांगितले, तर हे योग्य प्राधिकरण नेमके कुठे शोधायचे? निवडणूक आयोगाच्या यंत्रणेतील चुका किंवा अनियमिततेचा त्रास नागरिकांनी का सहन करावा, असा प्रश्नदेखील आव्हाडांनी उपस्थित केला.
हीच खरी वोट चोरी
तुम्हीच पैसे घेऊन नावे काढणार, खोट्या सह्या करणार, चूक मान्यही करणार आणि तरीही नागरिकांना मतदान व निवडणूक लढविण्याचा अधिकार न देण्याची भाषा करणार, तर मग नाव पुन्हा यादीत टाकण्याचे ढोंग कशासाठी? हीच खरी वोट चोरी. आम्ही वारंवार सांगितले होते खोटी नावे वाढवली जातात आणि खरी नावे कापली जातात. याचे पुरावेही आमच्याकडे आहेत. याबाबत एफिडेव्हिट कुठे द्यायचे ते स्पष्ट करा. राहुल गांधी यांच्या प्रकरणात तुम्ही एफिडेव्हिट मागितले होते, तसेच मीही पुराव्यासह एफिडेव्हिट द्यायला तयार आहे, असे आव्हानदेखील आव्हाड यांनी दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.