मुंबईतील रात्रशाळा मरणपंथाला
१३८पैकी उरल्या केवळ १०० शाळा; सरकारी धोरणांचे संकट
संजीव भागवत : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : मुंबईतील गिरणी कामगारांना शिक्षणाची द्वारे खुले करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अत्यंत मोलाची भूमिका बजावणाऱ्या मुंबईतील रात्रशाळा मरणपंथाला लागल्या आहेत. मागील नऊ वर्षांत मुंबईतील १३८ शाळांपैकी तब्बल १८ शाळांना टाळे लागले आहेत, तर यंदाच्या शैक्षणिक सत्रात शून्य पटसंख्या झाल्याने १७हून अधिक शाळांना टाळे लागणार आहे. मुंबईतील या रात्रशाळांची संख्या १००च्या आत येऊन ठेपली आहे.
शालेय शिक्षण विभागाकडून राबविण्यात येत असलेली रात्रशाळांसाठीची धोरणेच या शाळांचा गळा घोटण्यास कारणीभूत ठरत असल्याच्या प्रतिक्रिया शिक्षक, मुख्याध्यापक संघटनांच्या प्रतिनिधींकडून उमटल्या आहेत. काही शिक्षक संघटनांनीही आपल्या केवळ स्वार्थापायी रात्रशाळांना अडचणीत आणण्यासाठी दुबार शिक्षकांचे धोरण तसेच काही संस्थाचालकांनी केवळ शाळांच्या जागा बळकावण्याच्या नादात रात्रशाळांकडे दुर्लक्ष केल्यानेच यंदाच्या शैक्षणिक वर्षात मुंबईत कार्यरत असलेल्या १२० रात्रशाळांपैकी दक्षिण मुंबईतील सात, पश्चिम मुंबईतील चार आणि उत्तर मुंबईतील सहा शाळांत एकाही विद्यार्थ्यांचे नवीन प्रवेश होऊ शकले नाहीत. यामुळे या शाळांची पटसंख्या शून्यावर आली असल्याने त्यांना आपोआप टाळे लागणार असल्याचे शिक्षक प्रतिनिधींकडून सांगण्यात आले.
--
ऐतिहासिक वारसा
कष्टकरी, कामगारांना रात्रशाळांतही शिक्षण मिळावे, यासाठीची पहिली संकल्पना महात्मा फुले यांनी मांडली होती. त्याचदरम्यान १८८८मध्ये मुंबईत गिरगावात मुंबईतीलच नव्हे, तर देशातील पहिली रात्रशाळा म्हणून ब्रॅडले नाइट हायस्कूल सुरू झाली होती. ती २०१७मध्ये बंद पडली. आता त्या शाळेचे कार्यालयीन दप्तर मुंबई सेंट्रल येथील मॉडर्न नाइट स्कूल या ठिकाणी वर्ग करण्यात आले आहे. दुसरीकडे गिरगावातील पॉप्युलर नाइट स्कूल १, दादर व पॉप्युलर नाईट स्कूल २ या रात्रशाळा बंद पडल्या आहेत.
--
कोट
१५ मार्च २०२४च्या शासन निर्णयामुळे रात्रशाळांवर अभूतपूर्व संकट येणार आहे. सुमारे ४० रात्रशाळा बंद होतील. प्रत्येक वर्गाला आणि विषयाला शिक्षक कोणत्याही रात्रशाळेस मिळणार नाही. शासनाने आपल्या धोरणात बदल न केल्यास सर्वच रात्रशाळा तीन ते चार वर्षांत बंद करणे भाग पडेल. त्यामुळे यातील सेवेचे संरक्षण नसलेले शिक्षक रस्त्यावर येतील.
- ज. मो. अभ्यंकर, शिक्षक आमदार, मुंबई
--
मुंबईतील रात्रशाळांसाठी सरकारकडून नीट सहकार्य मिळत नसल्याने त्या संकटात सापडल्या आहेत. यामुळे पटसंख्या घटून शाळा बंद पडत असून, मुंबईतील रात्रशाळांचा वारसाच धोक्यात आला आहे. यावर लवकर उपाययोजना व्हायला हव्यात.
- अविनाश ताकवले, अध्यक्ष, राष्ट्रवादी शिक्षक सेल
-
रात्रशाळा टिकाव्या म्हणून शिक्षक परिषदेने कायमच आग्रही भूमिका घेतली. चांगली धोरणे सभागृहात आणली. काहींनी ती बदलल्याने शाळा संकटात आल्या आहेत.
- निरंजन गिरी, मुख्याध्यापक, मॉडर्न रात्रशाळा, मुंबई
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.