इंग्रजीच्या वाढत्या प्रभावामुळे मराठी संस्कृती संकटात
ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांचे ठाण्यात परखड मत
ठाणे, ता. ६ (बातमीदार) : ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांनी मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती एका गंभीर संकटातून जात असल्याचे मत ठाण्यात व्यक्त केले. या संकटासाठी इंग्रजी माध्यमाच्या वाढत्या प्रभावाला मोठ्या प्रमाणात जबाबदार धरणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. कोकण मराठी साहित्य परिषद, ठाणे जिल्हा शाखा आणि आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांच्या हस्ते पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
इंग्रजी माध्यमातील शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे आपल्या पालकांशी व संस्कृतीशी असलेले ‘गोत्र–सूत्र’ तुटत चालले आहे, अशी खंत पाटील यांनी व्यक्त केली. खेड्यातील मराठी शाळांमध्ये आईवडिलांचा आणि मुलांचा नातेसंबंध जिथे घट्ट राहतो तिथे इंग्रजी माध्यमात हा सांस्कृतिक दुवा कमी होतो, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. उत्तम लेखक किंवा कवी होण्यासाठी सातत्याने लिहीत राहणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले आणि आपल्या साहित्य प्रवासातील अनुभव या वेळी शेअर केले. अण्णा भाऊ साठे यांनी महानगरी साहित्याचा पाया घातला, असे त्यांनी विशेष नमूद केले.
साहित्य क्षेत्रातील कौतुक
पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांनी विश्वास पाटील यांच्या लेखनाचे कौतुक केले. साहित्यात राजकारण नसावे आणि त्यांनी यापुढेही अधिक पुस्तके लिहावीत, असे आवाहन कर्णिक यांनी केले. कोमसाप विश्वस्त आमदार संजय केळकर यांनीही पाटील यांच्या साहित्य योगदानाची प्रशंसा केली. या कार्यक्रमाला गझलकार दिलीप पांढरपट्टे, नमिता कीर, डॉ. प्रदीप ढवळ, बाळ कांदळकर यांच्यासह कोमसापचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
गिरणी कामगारांना वाऱ्यावर सोडले
पाटील यांनी त्यांच्या ‘लस्ट फॉर लालबाग’ या कादंबरीमागची पार्श्वभूमी स्पष्ट केली. मुंबईतील गिरणी जमिनींच्या कायद्यातील बदलांमुळे मूळ लालबाग–परळचा मराठी समाज कसा उद्ध्वस्त झाला, हे त्यांनी सांगितले. पूर्वी गिरण्यांसाठी राखीव असलेल्या मुंबईतील कॉटन मिलच्या जमिनी १९९० नंतर कायदे आणि नियम बदलताच विक्रीसाठी खुल्या झाल्या. गिरणीमालकांनी या जमिनी सोन्याच्या भावात विकल्या, मात्र गिरणी कामगारांचा विचार न करता त्यांना वाऱ्यावर सोडले. आंतरराष्ट्रीय व्यापारी आणि दलालांसाठी या जमिनी खुल्या झाल्या. जिथे विक्रीला मनाई होती तिथे आज ५०-६० कोटींचे फ्लॅट्स उभे आहेत. या प्रक्रियेत लालबाग–परळचा मूळ मराठी माणूस मुंबईबाहेर ढकलला गेला. याच वास्तवावर त्यांची ‘लस्ट फॉर लालबाग’ ही कादंबरी आधारित आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.