वसई, ता. ७ (बातमीदार) : महापालिका निवडणुका जारी झाल्या नाहीत, मात्र आतापासूनच उमेदवारीसाठी चांगली स्पर्धा लागल्याचे चित्र सध्या वसई-विरार परिसरात दिसत आहे. नगर परिषद आणि पंचायत समितीनंतर महापालिका निवडणुकीची चाहूल लागल्यापासून शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. पक्षाचे तिकीट मिळवण्यासाठी इच्छुकांची नेत्यांच्या घरी आणि पक्ष कार्यालयात अक्षरशः धावपळ सुरू झाली असून, गेल्या काही दिवसांत या हालचालींना विशेष वेग आला आहे. त्यात वरिष्ठ नेत्यांच्या शहरात फेऱ्याही वाढल्या आहेत. त्यामुळे सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या निवासस्थानी सकाळपासूनच कार्यकर्त्यांची गर्दी, तर पक्ष कार्यालयांमध्ये सतत सुरू असलेली बैठकांचे सत्र असे चित्र पाहायला मिळत आहे.
शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेससह इतर पक्षांमध्ये आतील स्पर्धा, गटा-तटांचे गणित, सोशल मीडिया टीम्सची हालचाल आणि भेटीगाठी हे सगळे आता एकाच वेळी सुरू असल्याचे दिसत आहे. तिकीट मिळवण्यासाठी अनेकांनी भूमिपूजनांचे कार्यक्रम, छोट्या पातळीवरील सभा, स्थानिक प्रश्नांवरील तत्पर प्रतिक्रिया, तसेच प्रभावी व्यक्तींना भेट देण्याची मालिका सुरू केली आहे.
एकीकडे पाच वर्षांहून अधिक काळ महापालिकेमध्ये प्रशासकीय राजवट आहे. यादरम्यान, नागरिकांची कामे होत नसल्याची तक्रार आहे. पुढील वर्षाच्या पहिल्याच महिन्यात निवडणुका लागण्याचे संकेत मिळू लागले आहेत. यासाठी महापालिका प्रशासनाकडूनदेखील जय्यत तयारी केली जात आहे. प्रभागरचना, प्रारूप मतदार याद्या तयार करण्यात आल्या आहेत. दुबार मतदारदेखील समोर आले आहेत. तसेच तांत्रिक त्रुटीदेखील नागरिकांकडून निदर्शनास आणू दिल्या जात आहेत. अनेक प्रभागातील मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात गेल्याने नागरिकांची अस्वस्थता वाढली आहे. त्यामुळे सुनावणी झाल्यावर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
विविध पक्षांमध्ये असलेले कार्यकर्ते हे तिकिटासाठी धावपळ करत आहेत. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन, शासन दरबारी धाव घेऊ लागले आहेत. प्रभागात काम करत आहोत, हे दाखविण्यासाठी जणू काही स्पर्धा सुरू झाली आहे. एकाच पक्षातून अनेक इच्छुक समोर येत असल्याने आपला ठसा किती प्रभाव आहे, हे कळावे यासाठी प्रयत्न होऊ लागला आहे. आपल्याला तिकीट मिळणार, असा ठाम विश्वास अनेकांना आहे. त्यामुळे प्रभाग पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. श्रेयाची लढाईदेखील दिसून येऊ लागली आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत उमेदवारांच्या मुलाखतीत कोण बाजी मारणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
पक्षप्रवेशाचे अच्छे दिन कोणासाठी?
कोणता झेंडा घेऊ हाती, अशी सध्या अवस्था कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झाली आहे. भाजप, शिवसेना, बविआ, मनसे व अन्य पक्षांत कार्यकर्त्यांची गर्दी वाढत आहेत. नाराजी, विकासकामे व महापालिकेवर सदस्य म्हणून निवडून येणे यासाठी पक्ष अदलाबदली सुरू झाली असून, या पक्षप्रवेशाने कोणाला अच्छे दिन येणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
निष्ठावंत की नवीन कार्येकर्ते सरस ठरणार?
जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना तिकीट मिळणार, की नव्याने पक्षात आलेल्यांना हे गुलदस्त्यात आहे. त्यामुळे तिकीट देताना कोण सरस ठरणार व त्यानंतर राजकीय समीकरणात कोणते फेरबदल होणार, याकडे राजकीय नजरा खिळून असणार आहेत.
नाराजीनाट्य रंगणार
तिकिटासाठी मोठी रांग अनेक प्रभागांत निर्माण होऊ लागली आहे. जर उमेदवारीचे तिकीट मिळाले नाही, तर नाराजीनाट्य रंगण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. त्यामुळे निवडणुकीत याचा कितपत प्रभाव निर्माण होईल, हे मतदानानंतर समोर येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.