मिनिमली इन्वेसिव्ह तंत्राने तीन रुग्णांना नवजीवन
जे. जे. रुग्णालयात हृदयाच्या गंभीर आजारावर उपचार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : राज्य सरकारच्या जे. जे. रुग्णालयाने हृदयविकार उपचार क्षेत्रात महत्त्वपूर्ण यश मिळवले आहे. रुग्णालयात मिनिमली इन्वेसिव्ह कार्डियक सर्जरी (एमआयसीएस) या अत्याधुनिक तंत्राद्वारे हृदय वाल्व प्रत्यारोपण आणि कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्ट (सीएबीजी) शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या. या तंत्रात छातीवर मोठा चिरा देण्याची गरज नसते; छोट्या चिऱ्यातूनच शस्त्रक्रिया पार पडत असल्याने रुग्णांना कमी वेदना, उत्तम सौंदर्यदृष्ट्या परिणाम आणि अल्प कालावधीत रुग्णालयातून डिस्चार्ज मिळतो.
उत्तर प्रदेशातील कृष्ण कुमार सिंह (वय २६) ऱ्ह्युमॅटिक हृदयरोगामुळे हृदय वाल्वच्या गंभीर आजाराने पीडित होते. अनेक रुग्णालयांत उपचार घेताना त्यांना ओपन हार्ट सर्जरीची गरज भासेल, असा सल्ला दिला गेला. मोठ्या चिरा आणि प्रदीर्घ पुनर्वसनाच्या भीतीमुळे ते आणि त्यांचे कुटुंब मानसिक तणावाखाली होते. त्याचप्रमाणे मनोहर जायसवाल (४१), व्यवसायाने मेकॅनिक आणि मधुकर (५२), दिहाडी कामगार- दोघांनाही इस्केमिक हृदयरोगाचे निदान झाले होते. कामकाजावर परिणाम होऊ नये आणि दीर्घकालीन रुग्णालयात दाखल राहण्याची वेळ येऊ नये, याची त्यांना मोठी चिंता होती.
देशभरातील अनेक रुग्णालयांत सल्लामसलत करूनही समाधानकारक पर्याय न मिळाल्याने हे तिन्ही रुग्ण संभ्रमात होते. याचदरम्यान त्यांच्या परिचितांनी समाजमाध्यमावरून जे. जे. रुग्णालयात छोट्या चिरा घेऊन हृदय शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध असल्याची माहिती दिली. त्यानंतर तिघेही मुंबईत जे. जे. रुग्णालयाच्या सीव्हीटीएस विभागात दाखल झाले आणि कार्डियक शल्यचिकित्सक डॉ. सूरज नागरे यांची भेट घेतली. डॉ. नागरे आणि त्यांच्या पथकाने रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मिनिमली इन्वसिव्ह शस्त्रक्रियेची प्रक्रिया, फायदे आणि धोके याबाबत सविस्तर माहिती दिली.
उच्च कौशल्य
डॉ. नागरे यांनी सांगितले की, या तंत्रासाठी विशेष प्रशिक्षण, उच्च कौशल्य, आधुनिक उपकरणे आणि संपूर्ण टीमचे परस्पर समन्वय अत्यावश्यक असतो. शस्त्रक्रिया रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार, अधीक्षक डॉ. संजय सुरासे, विभागाध्यक्ष डॉ. आशीष भीवापुरकर यांच्या मार्गदर्शनात पार पडल्या. शल्यचिकित्सकांच्या पथकात डॉ. श्रुती दुबे, डॉ. दीपक जायसवाल, डॉ. जरीन रंगवाला, डॉ. तन्मय पांडे, डॉ. रूटा सुखरामवाला, डॉ. हेमतसाई आणि डॉ. अश्विन सोनकांबळे यांचा सहभाग होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.