गावठाणात हक्काचे घर
पालघर जिल्ह्यात ५० हजार मालमत्तापत्रकांचे वाटप
निखिल मेस्त्री ः सकाळ वृत्तसेवा
पालघर, ता. ११ ः गावठाण जमिनीवरील घरांना मालमत्तापत्रक अर्थात प्रॉपर्टी कार्ड नसल्याने विविध समस्यांना सामोरे जावे लागते. मालमत्तापत्रक नसल्याने गृहकर्ज, नवीन घर बांधणी, घरांची दुरुस्तीसाठी परवानगी मिळत नव्हती. त्यामुळे महास्वामित्व योजनेअंतर्गत ड्रोन सर्वेक्षण करून मालमत्तापत्रक तयार करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला. या निर्णयाचा ८३२ गावांतील गावठाणातील ५० हजार घरधारकांना लाभ झाला आहे.
पालघर जिल्ह्याचे ग्रामीण व भौगोलिक क्षेत्र आव्हानात्मक आहे. याच अनुषंगाने गावठाण सर्वेक्षणासाठी ड्रोन तंत्रज्ञानातून प्रगत नकाशांकन केले जात आहे. भूमी अभिलेख कार्यालयातील उपलब्ध मनुष्यबळावर प्रत्येक तालुक्यात असे सर्वेक्षण सुरू आहे. जिल्ह्यातील गावांबरोबर त्याअंतर्गत येणाऱ्या घरांचे सर्वेक्षण पूर्ण होत आले आहे. गावठाण घरांचे चित्र सर्वेक्षणात टिपताना त्यांचे नकाशे तयार केले जात आहेत. यासह गावठाण क्षेत्रावरील घरे, खुल्या जागा, रस्ता, गल्ल्या, नाले यांचेही सर्वेक्षण करून त्यांना भूमापन क्रमांक दिला जात आहेत. प्रत्यक्ष वस्तुस्थितीदर्शक माहितीच्या आधारे घरांचे सीमांकन निश्चित करून गाव नकाशा उपलब्ध करून नंतर गावठाण घरांचे अंतिम मालमत्ता नकाशे, मालमत्तापत्रक तयार केले जात आहेत.
--------------------------
८३२ गावांवर ड्रोनच्या घिरट्या
- पालघर जिल्ह्यात १,०११ गावांपैकी ८३२ गावांमध्ये ड्रोन सर्वेक्षण सुरू आहे. सर्व्हे ऑफ इंडियाने जिल्हा भू अभिलेख कार्यालयाला ६९२ गावांची प्रत्यक्ष गाव पडताळणी म्हणजे ग्राउंड ट्रूथिंग करण्यास म्हटले. त्यानुसार सर्वेक्षण करून तशी नोंद प्रत्येक तालुक्यातील नोंदवहीत नोंद आहे. - आतापर्यंत जिल्ह्यातील आठ तालुक्यांत ६६८ गावांतील १५,८०३ मालमत्ताधारकांना मालमत्तापत्रकांचे वितरण करण्यात आले आहेत. उर्वरित ४९,९६० मालमत्ताधारक यांचे मालमत्तापत्रक (प्रॉपर्टी कार्ड) तयार होण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
-----------------------------------
सर्वेक्षणाचे फायदे
ड्रोन सर्वेक्षणामुळे सरकारी मालमत्ता संरक्षित होत आहे. यामुळे ग्रामस्थांना त्यांच्या घरांच्या मिळकतपत्रिका, मालकी हक्क नकाशा तसेच त्याबाबतचे अभिलेख तयार झाले आहेत. या उपक्रमामुळे भविष्यात ग्रामपंचायतीला अचूक अभिलेख नकाशे उपलब्ध होणार असल्याने घरांना कर आकारणी करणे सुलभ होणार आहे. त्यासह घरबांधणीला परवानगी देणे, अतिक्रमण निर्मूलन करणेही सोयीचे होणार आहे.
---------------------------------------
तालुका - एकूण गावे ड्रोन सर्व्हेची गावे प्रत्यक्ष गाव पडताळणी तयार वितरित
पालघर - २२६ १९७ १६६ १२,२६२ ५,८७२
वसई - १२५ ४५ ३८ १,९३२ १,२९९
डहाणू - १८३ १६९ १०६ ४,५३८ १,२४७
विक्रमगड - ९५ ८५ ७६ ६,३५९ १,६११
तलासरी - ४२ २७ २२ ९२८ ७६३
वाडा - १७२ १६६ १४६ ७,९८७ २,५४६
जव्हार - १०९ ८७ ८३ ९,०१२ १,४३४
मोखाडा - ५९ ५६ ५५ ६,९४२ १,०३१
एकूण - १,०११ ८३२ ६९२ ४९,९६० १५,८०३
----------------------------------
पालघर जिल्ह्यातील गावठाण भागातील घरांचे सर्वेक्षण काम ८८ टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित काम येत्या दोन महिन्यांत पूर्ण होईल. भूमी अभिलेख विभागाने कोणत्याही उपलब्ध मनुष्यबळात वाढवण, इतर भूसंपादन काम सांभाळत काम पूर्णत्वापर्यंत आणले आहे.
- नरेंद्र पाटील, जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक, पालघर