नाताळसाठी बाजारपेठा सजल्या
चॉकलेट बॉक्स, सजावटीच्या साहित्यांची मागणी वाढली
वाशी, ता. ११ (बातमीदार) ः नाताळ सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून, शहरभर तयारीचा उत्साह दिसू लागला आहे. घरांची रोषणाई, सजावटीच्या वस्तू, ख्रिसमस ट्री, स्टार, सांताक्लॉजचे ड्रेस, मास्क आणि विविध चमकदार वस्तूंनी बाजारपेठा रंगून गेल्या आहेत. विशेषतः मुलांना आकर्षित करणाऱ्या सांताक्लॉज कॅप, बेल्स, तसेच खेळणी आणि भेटवस्तूंची मोठी मागणी होत आहे. दुकानदारांनीही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नव्या कल्पना राबवण्यास सुरुवात केली आहे.
नाताळ म्हटले की आनंद, संगीत आणि केक या तिन्ही गोष्टींचा अविभाज्य संबंध असतो. या दिवसांत बाजारात केकच्या डिझाइन्समध्येही सांताचे विविध रूप पाहायला मिळत आहे. काही केक विक्रेत्यांनी तर खास उपक्रम राबवत प्रत्यक्ष सांताक्लॉजला दुकानात बोलावून केक आणि चॉकलेट वितरित करण्याची योजना आखली आहे. यामुळे मुलांमध्ये विशेष आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. नाताळाच्या निमित्ताने भेटवस्तूंची देवाण-घेवाण वाढते. त्यामुळे चॉकलेट बॉक्स, सजावटीचे गिफ्ट आणि विविध प्रकारातील चॉकलेटची विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. शहरातील मॉल्समध्ये ठेवण्यात आलेल्या प्रीमियम चॉकलेट बॉक्सची किंमत ८०० रुपयांपर्यंत असून, प्लेन चॉकलेट, अॅनिमल बटरफ्लाय, ‘लव्ह’, ‘व्ही’, तारे, त्रिकोणी आकार अशा अनेक आकर्षक प्रकारांमध्ये चॉकलेट उपलब्ध आहेत, अशी माहिती विक्रेते रवी कानावत यांनी दिली. याशिवाय घराच्या सजावटीसाठी रंगीबेरंगी लायट्स, सजावटीच्या माळा, ‘मेरी ख्रिसमस’ स्टिकर्स, तसेच ख्रिसमस ट्रीच्या सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांची लगबग वाढली आहे. टिकाऊपणा आणि विविधतेमुळे चॉकलेट पदार्थांनाही विशेष पसंती मिळत आहे.
....................
सांता सजावटीच्या वस्तू — किंमत
सांता कॅप : २५ ते ७५ रुपये
सांता क्रिप सेट : ५०० ते १५०० रुपये
सांता बेल्स : ५ ते २० रुपये
सांता बलून : २० ते १०० रुपये
सांता मास्क : ५० ते १०० रुपये
सांता ट्री : १७५ ते १२०० रुपये
सांता स्टार : ५५ ते २५० रुपये
सांता ड्रेस : २५० ते १५०० रुपये
सांता कॅंडल : २० ते ८० रुपये