बेकायदा इमारतप्रकरणी कारवाईचा फास
सरपंच, ग्रामपंचायत अधिकाऱ्यांविरोधात अहवाल
तारापूर, ता.११ (बातमीदार)ः बोईसर ग्रामपंचायत हद्दीतील शासकीय जमिनीवर मे. डायनामिक डेव्हलपरतर्फे बांधलेली २४ सदनिका आणि १२ वाणिज्य गाळ्यांची इमारत बेकायदा असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात बोईसरचे सरपंच दिलीप धोडीसह तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी पंकेश संखेवर शिस्तभंगाची कार्यवाही व्हावी, असा अभिप्राय गटविकास अधिकारी संजय भोये यांनी नोंदवला आहे.
बोईसर पूर्व (दांडीपाडा) येथील सर्व्हे क्र. २७/१ ते ६५/१३ मिळून क्षेत्र ०.६६.०० ही महाराष्ट्र शासनाची जमीन आहे. या जमिनीवर डायनामिक डेव्हलपर्सचे मालक अब्दुल ऊर्फ बारूदगर तसेच दिपा रामचंद्र भोईर (दीपा दिलीप धोडी), अलका दिलीप धोडी, प्रीती दिलीप धोडी आणि मंजू शंकर धोडी यांनी मिळून १०० फूट लांब, ४० फूट रुंद व ४० फूट उंच अशी तळमजला, तीन मजल्यांची पक्की इमारत उभी केली. इमारत बांधण्यासाठी शासनाकडून कोणतीही परवानगी घेण्यात आली नसल्याचे दस्तऐवजांतून स्पष्ट झाले आहे.
--------------------------------------
प्रमुख आरोपी वगळले
मंडळ अधिकारी विजय गुंडकर यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम १९६६ च्या कलम ५२ अंतर्गत बोईसर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे, मात्र सरपंच दिलीप धोडी, ग्रामपंचायत अधिकारी पंकेश संखेला वगळले होते, मात्र गटविकास अधिकाऱ्यांच्या अहवालानंतर दोघांवर कारवाई करण्याची मागणी तक्रारदाराने केली आहे.