ऐरोली नाक्यावर ना उड्डाणपूल, ना भुयारी मार्ग
विकास प्रकल्प १३ वर्षांपासून लालफितीत अडकले
वाशी, ता. ११ (बातमीदार) ः ठाणे-बेलापूर मार्गाशी ऐरोली नाका परिसराला जोडणारा वाहनांसाठीचा महत्त्वाचा भुयारी मार्ग मागील १३ वर्षांपासून रखडलेला असून, या कालावधीत ना भुयारी मार्ग उभा राहिला, ना उड्डाणपुलाचा पर्याय मार्गी लागला. नवी मुंबई महानगरपालिकेने २०१३ मध्येच रेल्वेला ३७ लाख ३२ हजार ५०० रुपये भरून भुयारी मार्गाचे प्राथमिक काम सुरू करण्याचा प्रयत्न केला होता. शिवाय पाच वेळा निविदाही काढल्या गेल्या; परंतु काम अत्यंत किचकट असल्याचे सांगून कोणताही ठेकेदार पुढे आला नाही. रेल्वेकडूनही आवश्यक परवानग्या, तांत्रिक सहकार्य आणि मार्गदर्शन मिळाले नाही. त्यामुळे प्रकल्प सुरू होण्याआधीच स्थगित झाला.
या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याची शक्यता तपासण्यात आली, परंतु उच्चदाबाच्या वीजवाहिन्यांमुळे रेल्वे प्रशासनाने हा प्रकल्पही अशक्य असल्याचे स्पष्ट केले. पालिकेने त्यानंतर नव्याने प्रस्ताव पाठवला असला, तरी त्यालाही रेल्वेकडून मंजुरी मिळालेली नाही. परिणामी दोन्ही प्रकल्प भुयारी मार्ग आणि उड्डाणपूल आजही फायलींच्या राशीतच अडकले आहेत.
याचा फटका स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. ऐरोली नाका, ऐरोली गाव, शिव कॉलनी, महावितरण वसाहत येथील रहिवासी रोजच्या प्रवासासाठी जीव मुठीत धरून रेल्वेलाइन ओलांडतात. चिंचपाडा परिसरात अशा प्रकारे रेल्वे क्रॉसिंग करताना अनेकदा अपघातही झाले आहेत. शालेय विद्यार्थ्यांना तर सर्वाधिक त्रास सहन करावा लागत असून, सेक्टर-३ मधील विद्यमान भुयारी मार्ग अरुंद, काळोख असलेला आणि अत्यंत धोकादायक असल्याने तेथून दररोज जाणे म्हणजे मोठा संघर्ष ठरतो.
एक दशक उलटूनही या ठिकाणी कोणतीही सुरक्षित व सुलभ सुविधा उभारली गेली नसल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे. पालिकेने आणि रेल्वे प्रशासनाने एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याऐवजी तातडीने निर्णय घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे. यासंदर्भात शहर अभियंता शिरीष आरदवाड याच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.