दादरचा गड राखण्यासाठी दोन्ही शिवसेनेमध्ये चुरशीची लढत
रजनीकांत साळवी : सकाळ वृत्तसेवा
प्रभादेवी, ता. १५ : माहीम विधानसभा मतदारसंघात खासदार आणि आमदारही शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आहेत. या मतदारसंघावर गेली कित्येक वर्षे आता शिंदेंकडे गेलेले माजी आमदार सदा सरवणकर यांची पकड होती. त्यामुळे येणाऱ्या आगामी पालिका निवडणुकीत दादरचा गड राखण्यासाठी या ठिकाणी चुरशीची लढाई रंगणार आहे.
ठाकरे बंधू एकत्र आल्याने या वेळी दादर, माहीममध्ये त्यांना त्याचा फायदा होईल, की शिंदेसेनेचे पारडे जड होईल यासाठी आतापासूनच दोन्ही पक्षांमध्ये समीकरणे बांधली जात आहेत. पालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १९४ मधून माजी आमदार सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर यांच्याविरोधात आताचे आमदार महेश सावंत हे अपक्ष म्हणून उभे राहिले होते. केवळ २५९ मतांनी त्यांचा पराभव झाला होता.
आता पुन्हा एकदा प्रभाग क्रमांक १९४ मधून शिंदे सेनेचे समाधान सरवणकर हे निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत, परंतु आताची या प्रभागातील समीकरणे बदललेली आहेत. गेल्या वेळेस समाधान यांच्यासमोर पराभूत झालेले महेश सावंत हे आता आमदार आहेत. त्यामुळे या ठिकाणी वर्चस्वाची लढाई होणार आहे.
प्रभाग क्रमांक १९४ मध्ये येणाऱ्या प्रभादेवी, खेडगल्ली, साई भक्ती मार्ग, साई सुंदर, गोपाळ नगर, आहुजा, कामगार नगर, धनमिल नाका या भागात सर्वात जास्त मराठी मतदार आहेत. तसेच तेलुगू, उत्तर भारतीय, बुद्धिस्ट अशी जवळपास ५० हजार लोकसंख्या आहे. मधल्या काळात भाजपने आपले वर्चस्व या ठिकाणी सिद्ध केले होते, मात्र त्यांना पाहिजे तितके यश मिळाले नाही. प्रभागातील रखडलेले पुनर्वसन लवकरात लवकर व्हावे, जेणेकरून वर्षानुवर्षे विस्थापित झालेल्या भाडेकरूंना त्यांच्या हक्काच्या घरात राहता येईल. तसेच विविध ठिकाणी सुरू असलेल्या पुनर्वसन प्रकल्पामुळे धुळीचे साम्राज्य वाढले आहे. त्यामुळे श्वसनाचे विकार वाढले आहेत. यावर उपाययोजना आखणे गरजेचे असल्याचे मिलिंद नागवेकर यांनी सांगितले.
लोकसभा, विधानसभेचे चित्र
सध्या शिवसेना ठाकरे गटाचे अनिल देसाई हे खासदार आहेत, तर आमदार महेश सावंत हेदेखील ठाकरे सेनेचेच आहेत. त्यामुळे येथे ठाकरे गटाचे पारडे जड आहे.
प्रमुख समस्या
विभागात रखडलेली पुनर्विकासाची कामे, त्याचप्रमाणे स्टॅंडर्ड मिल, क्राऊन मिल, सेंचुरी मिल, बॉम्बे डाइंग मिल येथील कामगारांच्या घरांचा प्रश्न प्रलंबित आहे. कंपन्यांमध्ये रोजगारासाठी स्थानिकांना प्राधान्य दिले पाहिजे, अशी मागणी गिरणी कामगार आणि सामाजिक कार्यकर्ते धनंजय खाटपे यांनी केली.
पालिका निवडणूक २०१७
* समाधान सरवणकर - ८,६२३
* महेश सावंत - ८,३६४
* संतोष धुरी - ६,६८४
* सूर्यकांत धावले - ५,११२
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.