मुंबई

शहापूरला पाणीटंचाईचे चटके

CD

भरत उबाळे : सकाळ वृत्तसेवा
शहापूर, ता. १५ : यंदा पावसाने तब्बल पाच महिने मुक्काम ठोकला असला, तरी दरवर्षी जानेवारी, फेब्रुवारीत जाणवणारी पाणीटंचाई यंदा चक्क डिसेंबरच्या सुरुवातीलाच शहापूर तालुक्यात डोके वर काढू लागली आहे. तालुक्यातील कसारा परिसरातील पारधवाडी, नारळवाडी, पायरवाडी, वेळूक, ढाकणे आदी गावे व वाड्यावस्त्यांवर पाणीटंचाईचे भीषण संकट कोसळले आहे. हातपंप व विहिरी अक्षरशः कोरड्याठाक पडल्या आहेत.
साधारणतः फेब्रुवारीमध्ये पाणीटंचाई जाणवणाऱ्या शहापूर तालुक्यात यंदा डिसेंबरच्या सुरुवातीलाच परिस्थिती गंभीर झाली आहे. कसारा भागातील वाड्यांवरील विहिरींमध्ये पाण्याचा ठणठणाट असून सर्वच स्रोत आटले आहेत. कळमांजरा दरीतून दोन किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागत असल्याने घरकाम, कुटुंबाची जबाबदारी आणि मुलांचे संगोपन करताना महिलांची अक्षरशः जीवघेणी तडफड सुरू आहे. ‘पाणी मिळणार कधी आणि भूक कशी भागवायची?’ असा गहन प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला आहे. ‘डिसेंबरमध्येच ही अवस्था असेल तर पुढील उन्हाळा कसा जाणार’, असा सवाल ग्रामस्थ रामदास मांगे, काशिनाथ पारधी, गणेश व्हगे यांनी उपस्थित केला आहे.
दुर्गम आदिवासी पाड्यांवर पिण्याच्या पाण्यासाठी माताभगिनींना खाचखळग्यांच्या पायवाटांमधून दोन ते चार किलोमीटर अंतरावरील खोल दरीखोऱ्यांत जावे लागत आहे. डोक्यावर चार-चार हंडे घेऊन पाण्यासाठी करावी लागणारी ही रोजची पायपीट अत्यंत हालअपेष्टांची ठरत आहे. पाणी मिळविण्याच्या या संघर्षामुळे ग्रामस्थांच्या रोजंदारीवर गदा आली आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचाही प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
ग्रामस्थांच्या मागणीनुसार कसारा ग्रामपंचायतीने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाचे लक्ष वेधले आहे. मात्र, टँकर कधी सुरू होणार, याबाबत अद्याप कोणतेही स्पष्ट उत्तर देण्यात आलेले नसल्याने ग्रामस्थ व माताभगिनींचे लक्ष प्रशासनाकडे लागले आहे.

जलाशय असूनही तहानलेले
मुंबई महानगरातील कोट्यवधी नागरिकांची तहान भागवणारे तानसा, भातसा आणि मोडकसागर हे भव्य जलाशय शहापूर तालुक्यातच असतानाही हा तालुका मात्र आजही तहानलेलाच आहे. गेल्या अनेक वर्षांत विविध पाणीपुरवठा योजनांवर व त्यांच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला, तरीही पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी सुटलेला नाही. दरवर्षी टँकरद्वारे पाणीपुरवठा करून त्यावरही मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जातो, मात्र तो केवळ तात्पुरता उपाय ठरत आहे.

योजनेत दिरंगाई
तालुक्यातील दुर्गम भागातील पाणीटंचाई कायमस्वरूपी दूर करण्यासाठी इगतपुरी तालुक्यातील भावली धरणातून पाणीपुरवठा योजना राबविण्याचे काम सुरू आहे. मात्र प्रशासकीय अडथळे आणि दिरंगाईमुळे ही योजना निर्धारित कालावधीच्या दुप्पट काळ लोटूनही अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे या योजनेवर आत्तापर्यंत खर्च झालेले कोट्यवधी रुपये पाण्यात जातात की काय, अशी शंका टंचाईग्रस्त गावकरी व्यक्त करीत आहेत.

शाळांना दांडी
पाणीटंचाईमुळे रोजगार आणि शिक्षण दोन्ही बाधित झाले आहेत. पाण्यासाठी मुलांना सोबत घेऊन जावे लागत असल्याने शाळांना दांडी बसते. तर कामावर गेल्यास तहानेची चिंता सतावत राहते. ‘पाणीटंचाईचा तालुका’ अशी ओळख निर्माण झालेल्या शहापूरमध्ये येत्या काळात टप्प्याटप्प्याने टंचाईग्रस्त गावपाड्यांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कारला धडकल्यानंतर पिकअपला लागली आग; तिघांचा होरपळून मृत्यू, एक जण गंभीर जखमी

Latest Marathi News Live Update : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांची आज कोल्हापुरात महासभा

Supreme Court : 'its very serious issue' सर्वोच्च न्यायालयात वकिलांमध्ये जोरदार युक्तिवाद, CJI सूर्यकांतही संतापले, खटला अतिशय गंभीर

Maharashtra Winter Update : राज्यातील थंडी गायब की गारठा कायम राहणार? हवामान विभागाचा महत्त्वाचा अंदाज समोर

Semiconductor : सेमीकंडक्टरच्या क्षेत्रामध्ये ‘स्वदेशी’ झेप; मायक्रोप्रोसेसर ‘ध्रुव-६४’चे लाँचिंग, ‘सीडॅक’ने बनविला आराखडा

SCROLL FOR NEXT