खारघर सेक्टर १२ मधील नागरी समस्यांसाठी लढा देणार
गणेश चॅरिटेबल ट्रस्टच्या सेक्रेटरी मीनल पाटील यांचा निर्धार
खारघर, ता. १७ (बातमीदार) : खारघर सेक्टर १२ परिसरात सुमारे ४० हजार लोकसंख्या वास्तव्यास असून, येथील नागरिकांना भेडसावणाऱ्या मूलभूत नागरी समस्या दूर करण्यासाठी सातत्याने लढा देणार असल्याचा ठाम निर्धार खारघरचा राजा गणेश चॅरिटेबल ट्रस्टच्या सेक्रेटरी मीनल विजय पाटील यांनी व्यक्त केला आहे. या परिसरातील पाणीटंचाई, पार्किंगची समस्या तसेच फेरीवाल्यांचे अतिक्रमण या तीन प्रमुख प्रश्नांबाबत सिडको व पालिका प्रशासनाकडे पत्रव्यवहार सुरू असून, हे प्रश्न मार्गी लागेपर्यंत संघर्ष सुरूच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
सेक्टर १२ साठी स्वतंत्र जलकुंभ उभारण्यात यावा, ही येथील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची प्रमुख मागणी आहे. बीयूडीपी योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या बैठ्या चाळ्यांमध्ये अनेक दशकांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांना अद्याप सिडकोकडून पुरेसा व नियमित पाणीपुरवठा मिळत नाही. त्यामुळे नागरिकांना आजही जुन्या विहिरी व कूपनलिकांवर अवलंबून राहावे लागत आहे. दूषित पाण्यामुळे पोटदुखी, उलटी, जुलाब यांसारख्या आजारांना नागरिकांना सामोरे जावे लागत असल्याचे वास्तव समोर येत आहे. पार्किंगचा प्रश्नही सेक्टर १२ मध्ये गंभीर आहे. इतर सेक्टरमध्ये चार पदरी रस्ते विकसित करण्यात आले असताना, सेक्टर १२ मध्ये अरुंद रस्त्यांची निर्मिती झाल्याने वाहनतळाची पुरेशी जागा उपलब्ध नाही. परिणामी नागरिकांना रस्त्याच्या कडेला वाहने उभी करावी लागतात. ही समस्या सोडवण्यासाठी खारघर सेक्टर ६ ते सेक्टर १२ शिवमंदिर मार्गावरील नाल्याचे आरसीसी बांधकाम करून तो बंदिस्त करावा व त्यावर ‘पे अँड पार्किंग’ प्रकल्प राबवावा, अशी मागणी पालिका प्रशासनाकडे करण्यात आली आहे. यामुळे वाहतुकीची कोंडी कमी होऊन पालिकेच्या उत्पन्नातही भर पडू शकते.
.................
फेरीवाल्यांचे अतिक्रमण
सेक्टर १२ मधील तिसरी मोठी समस्या म्हणजे फेरीवाल्यांचे अतिक्रमण. विघ्नहर्ता कॉम्प्लेक्स ते गोखले शाळा मार्गे शिल्प चौकाकडे जाणारा एकमेव अरुंद रस्ता असून, दोन्ही बाजूंनी पदपथांवर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्याने वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. याचा फटका पादचारी, दुकानदार व व्यापाऱ्यांना बसत आहे. नाल्यालगत वाहनतळाच्या एका बाजूला भाजी, मटण, चिकन व मासळीचे अधिकृत मार्केट उभारल्यास फेरीवाल्यांचा प्रश्न कायमचा सुटेल, असा विश्वास मीनल पाटील यांनी व्यक्त केला.
..........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.