सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २० : गेल्या अनेक दिवसांपासून नवी मुंबईसह परिसरातील हवेचा दर्जा खालावलेला आहे. याकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी वाशीतील सी-शोर परिसरात शुक्रवारी (ता. १९) सकाळी युवकांनी मानवी साखळी आंदोलन केले. स्वच्छ हवेच्या मागणीसाठी नॅटकनेक्ट फाउंडेशनतर्फे हा उपक्रम राबवण्यात आला.
वाशी सेक्टर १०-ए येथील सागरी किनाऱ्यावर सकाळी सात वाजल्यापासून जवळपास दोन तास ही मानवी साखळी शांततेत उभी होती. निवडणूक काळात अल्पकालीन आश्वासनांमुळे आणि पायाभूत सुविधांच्या चर्चेमुळे दुर्लक्षित राहणाऱ्या सार्वजनिक आरोग्याच्या मुद्द्याला पुन्हा केंद्रस्थानी आणण्याचा हा प्रयत्न असल्याचे तरुणांनी सांगितले. स्वच्छ हवेसाठी मतदान करा, अशा फलकांसह युवकांनी खांद्याला खांदा लावून उभे राहत वाढत्या प्रदूषण संकटाकडे लक्ष वेधले. नागरिकांच्या सामूहिक चिंतेचा शांत अभिव्यक्ती असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी वायुप्रदूषण हा दुय्यम विषय राहता कामा नये, असे सांगितले. स्वच्छ हवा हा निवडणुकीचा मुद्दा झाला पाहिजे, असे सांगत त्यांनी मतदारांनी पर्यावरणाबाबत उमेदवारांना थेट प्रश्न विचारावेत, असे आवाहन केले. या मानवी साखळीमुळे सकाळच्या फिरस्तीला आलेले नागरिक, धावपटू आणि ज्येष्ठ नागरिक थांबून पाहू लागले. आपण सगळेच या प्रदूषणाचे बळी आहोत, अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली.
‘कठोर नियमांची आवश्यकता’
कुमार यांनी शहरात ३-३-३०० नियमाची कठोर अंमलबजावणी करण्याची गरजही अधोरेखित केली. या शहरी नियोजन संकल्पनेनुसार प्रत्येक नागरिकाला घरातून किमान तीन झाडे दिसली पाहिजेत, ३०० मीटरच्या आत हिरवे क्षेत्र असावे आणि प्रत्येक परिसरात किमान ३० टक्के वृक्षछत्र (ट्री कॅनोपी) असावी.
स्वयंसेवकांच्या माध्यमातून लक्ष
- ‘उर्वरी’च्या संचालक वसुधारा गुप्ते यांनी सांगितले की, बांधकामांच्या प्रदूषणावर स्वयंसेवक लक्ष ठेवत असून, प्रदूषण नियंत्रण अधिकाऱ्यांना सातत्याने माहिती देत आहेत. जनमत तयार करण्यासाठी स्वाक्षरी मोहिमाही राबवण्यात येत आहे.
- इंडियन वुमन सायंटिस्ट्स असोसिएशनच्या विनी संधू यांनीही या उपक्रमात सहभाग घेत शहरात हरित क्षेत्र वाढवण्याची गरज अधोरेखित केली आणि झाडांना ‘नैसर्गिक ऑक्सिजन कारखाने’ असे संबोधले.
- धूळ नियंत्रण आणि उत्सर्जन नियमांची कमकुवत अंमलबजावणी मुलांपासून वृद्धांपर्यंत आणि श्वसन विकार असलेल्या नागरिकांसाठी गंभीर आरोग्य धोके निर्माण करत असल्याचे ‘उर्वरी’च्या समन्वयक सिया गुप्ता यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.