आचारसंहितेनंतर ७२ तासांत होर्डिंग्ज गायब
नोडनिहाय पथके तैनात; महापालिकेला अतिरिक्त अधिकाऱ्यांची गरज
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २० : नवी मुंबई महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक १५ जानेवारी २०२६ला होत असून, १५ डिसेंबरपासून आचारसंहिता लागू झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार आचारसंहितेच्या ७२ तासांत अनधिकृत बॅनर्स, पोस्टर्स व होर्डिंग्ज हटविण्यासाठी धडक मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत आठ विभाग कार्यालय क्षेत्रांतून १००१ बॅनर्स, ५७८ कटआउट/होर्डिंग्ज, २०४ पोस्टर्स, १२० झेंडे आणि ८४ भित्तिलेखन काढून टाकण्यात आले.
महापालिकेच्या तसेच शासकीय व सार्वजनिक-खासगी जागांवरील राजकीय मजकूर हटविण्यात आला. या कारवाईचा आढावा महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी नोडल अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेतला. निवडणूक प्रक्रियेतील कामे वेळेत पूर्ण व्हावीत म्हणून विषयानुसार नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्या नियंत्रणाखाली आचारसंहिता कक्ष, गस्त पथके, चेकपोस्ट व व्हिडिओ सर्व्हिलन्स पथके कार्यरत आहेत. कायदा-सुव्यवस्थेसाठी अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस विभागाशी समन्वय साधण्यात येत आहे.
उमेदवारांसाठी ‘एक खिडकी’ योजना
नामनिर्देशनासाठी आवश्यक मालमत्ता कर, पाणीपट्टी व विविध विभागांची ना-हरकत प्रमाणपत्रे एकाच ठिकाणी मिळावीत, यासाठी प्रत्येक विभाग कार्यालयात ‘एक खिडकी’ योजना राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
निवडणुकीसाठी ६,२७५ कर्मचाऱ्यांची आवश्यकता
मतदान व मतमोजणीसाठी ६,२७५ कर्मचाऱ्यांची गरज असून, मनुष्यबळ व्यवस्थापनासाठी प्रशासन विभागाचे उपआयुक्त किसनराव पलांडे यांना तातडीच्या कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मतदान केंद्रे व निवडणूक कार्यालयांचे जिओ-टॅगिंगही करण्यात येणार आहे.
कोट
नवी मुंबई महापालिकेची निवडणूक निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, निवडणूकविषयक विविध कामांकरिता नियुक्त नोडल अधिकारी यांच्यामार्फत आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे.
- कैलास शिंदे, आयुक्त, नवी मुंबई महापालिका
चौकट
ठळक आकडेवारी
हटविण्यात आलेले अनधिकृत साहित्य
बॅनर्स : १,००१
कटआऊट / होर्डिंग्ज : ५७८
पोस्टर्स : २०४
झेंडे : १२०
भित्तिलेखन : ८४
एकूण कारवाई : १,९८७ घटकांवर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.