पाण्यासाठी भटकंतीची वेळ
सूत्रकार, वसा गावातील पाणीपुरवठा योजना रखडल्या
तलासरी, ता. २३ (बातमीदार)ः तालुक्यातील सूत्रकार, वसा ग्रामपंचायत हद्दीतील पाणीपुरवठा योजना, जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेली कामे ‘रामभरोसे’ असल्याचे चित्र आहे. कोट्यवधींची निधी मंजूर होऊनही जागेचा अभाव, वन विभागाच्या परवानग्यांचा विलंब, ठेकेदारांची मनमानी, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पाण्यासाठी भटकंतीची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.
सूत्रकार पाणीपुरवठा योजनेअंतर्गत उपलाट, वरवडा, कुर्झे आदी गावांचा समावेश आहे. या योजनेसाठी ७६.७८ कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. आतापर्यंत योजनेतील ६७ टक्के कामे प्रगतिपथावर असून, प्रत्यक्षात तीन महत्त्वाच्या पाण्याच्या टाक्यांसाठी आवश्यक जागा अद्याप ग्रामपंचायतीकडून उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. या योजनेत बोरवाडी (गावठाण परिसर), उपलाट-गिरीखाचा पाड, दोधर पाडा येथील टाक्यांचे काम प्रस्तावित आहे. मात्र, जागेअभावी ही कामे अद्याप सुरूच झालेली नाहीत, तर वसा ग्रामपंचायत हद्दीतील स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेची सुमारे ७३ टक्के प्रगती झाली असून योजनेसाठी ११.७० कोटींची निधी मंजूर आहे. मात्र, सुतारपाडा, कुंभारपाडा परिसरासाठी प्रस्तावित उंच जलकुंभासाठी आवश्यक जागा नसल्यामुळे कामे पूर्णपणे ठप्प आहेत. त्यामुळे योजनेच्या मुदतवाढीसाठी प्रस्ताव पाठवण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.
--------------------------
वन विभागाचा अडथळा
अनेक ठिकाणी पाण्याच्या टाक्या, जलवाहिनीसाठी लागणारी जमीन वन विभागाच्या अखत्यारीत येत असल्याने परवानग्या मिळण्यात मोठा विलंब झाला आहे. सुरुवातीच्या टप्प्यातच जागा, परवानग्यांचे नियोजन रखडल्याने कामे रखडली आहेत.
-----------------------
महिलांची वणवण
रखडलेल्या योजनांचा सर्वाधिक फटका महिलांना बसत आहे. आजही हंडाभर पाण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागत आहे. पाणी भरण्यासाठी होणारी दगदग, वेळेचा अपव्येयान आरोग्यावर परिणाम झाल्याने महिलांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
------------------------
सूत्रकार, वसा ग्रामपंचायत हद्दीतील पाणीपुरवठा योजनेसाठी जागा नसल्याने तसेच वन विभागाच्या परवानग्या अशा विविध अडचणींमुळे रखडल्या आहेत. मात्र, यावर शासन निर्णयानुसार योग्य पर्याय शोधून लवकरात लवकर कामे सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
- महेश पाटील, उपअभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण
-------------------
दीर्घकाळापासून पाणीपुरवठा योजनेची कामे अर्धवट आहेत. त्यामुळे भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. शासनाने तातडीने उपाययोजना करून कामे जलद गतीने सुरू करण्याचे आदेश द्यावेत.
-माधुरी गोवारी, सरपंच, सूत्रकार ग्रामपंचायत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.