मतदान केंद्रासाठी गृहसंकुलांना बगल
शाळा, सरकारी इमारतींमध्ये होणार मतदान; उमेदवारांचा ‘प्रभाव’ रोखण्यासाठी प्रशासनाचा निर्णय
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २३ ः ठाणे महापालिका निवडणुकीसाठी प्रशासकीय तयारीने आता वेग घेतला असून, मतदानासाठी शाळा, महाविद्यालये आणि सरकारी इमारतींवरच भर दिला जाणार आहे. गेल्या काही निवडणुकांमध्ये रहिवासी सोसायट्यांमध्ये मतदान केंद्रे उभारली जात होती; मात्र या वेळी कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा उमेदवाराचा मतदानावर ‘प्रभाव’ पडू नये, यासाठी गृहसंकुलांना या यादीतून वगळण्यात आले आहे. ठाणे महापालिकेच्या ३३ प्रभागांमधील १३१ नगरसेवकपदांसाठी ही निवडणूक होत आहे. प्रशासनाने सुमारे ५०० ठिकाणे निश्चित केली असून, एकूण मतदान केंद्रांची संख्या २१०० पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, प्रत्येक ८०० ते ९०० मतदारांमागे एक केंद्र याप्रमाणे नियोजन करण्यात येत आहे.
ठाणे महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून, जागावाटपाच्या जोरबैठका राजकीय पक्षांकडून सुरू आहेत. याचदरम्यान,, लोकशाहीचा हा उत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासकीय लगबगही शिगेला पोहोचली आहे. निवडणूक आयोगाने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार ही तयारी सुरू आहे. त्याअंतर्गत मतदान केंद्र उभारण्यात येत आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतदान केंद्र बनवण्यात आले होते. त्यासाठी सोसाट्यांच्या पदाधिकाऱ्यांची मदत घेण्यात आली होती. सोसायटीमध्येच मतदानाची सोय उपलब्ध झाल्याने त्याचा तेथील रहिवाशांना दिलासा मिळाला होता, पण आता अशाप्रकारच्या रहिवासी सोसायट्यांना आणि इमारतींना या वेळी वगळण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
१३१ नगरसेवकपदांसाठी होणार्या या निवडणुकीत विविध राजकीय पक्ष आणि अपक्ष अशा उमेदवारांची संख्या पाच ते दहा पट असण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे उमेदवार किंवा त्यांचे नातेवाईक, कार्यकर्ते राहत असलेल्या गृहसंकुले, इमारतींमध्ये मतदान केंद्र उभारल्यास त्यांच्या प्रभावाखाली मतदान होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे अशा इमारती, रहिवासी सोसायट्यांची छाननी करणेही शक्य नाही. त्यामुळे सरसकट सर्वच सोसायट्यांना मतदान केंद्रांच्या यादीतून बगल देण्यात आली असून, शाळा, महाविद्यालय, शासकीय इमारतींमध्ये मतदान केंद्रे उभारण्यात येत असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.
८०० ते ९०० मतदारांसाठी एक केंद्र
हरकती सूचनांनंतर प्रशासनाने मतदारांची अंतिम यादी जाहीर केली असून, त्यानुसार सुमारे १६ लाख ४९ हजारांच्या पुढे मतदार आहेत. प्रभागनिहाय मतदारांच्या संख्येनुसार मतदार केंद्र निश्चित केले जात आहे. सुमारे ८०० ते ९०० मतदारांसाठी एक केंद्र असे प्रशासनाचे नियोजन आहे.
बाळकुम, मानपाडामध्ये सर्वाधिक केंद्रे
मतदान केंद्र निश्चित करताना ३३ प्रभागांमध्ये सुमारे ५०० ठिकाणांची चाचपणी प्रशासनाने केली आहे. १३१ नगरसेवकपदांसाठी ही निवडणूक होणार असल्याने प्रत्येक पॅनेलमधील मतदारसंख्येचा विचार करण्यात आला आहे. ज्या प्रभागामध्ये मतदार जास्त असतील, तेथे मतदान केंद्रांची संख्या वाढवण्यात येणार आहे. त्यानुसार बाळकुम, मानपाडा येथील प्रभागांमध्ये मतदान केंद्र सर्वाधिक असण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.