जिल्ह्यात ‘१०८’ रुग्णवाहिका ठरतेय जीवनदायिनी
लाखो रुग्णांना वेळेत उपचार; ६११ बाळांचा रुग्णवाहिकेतच जन्म
अलिबाग, ता. २३ वार्ताहर ः ग्रामीण भागासह शहरी परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना तातडीची वैद्यकीय मदत मिळावी, या उद्देशाने राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेली ‘१०८’ रुग्णवाहिका सेवा रायगड जिल्ह्यातील नागरिकांसाठी खऱ्या अर्थाने जीवनदायिनी ठरत आहे. २०१४ पासून आजतागायत या सेवेमुळे जिल्ह्यातील तब्बल २ लाख ५५ हजारांहून अधिक रुग्णांना वेळेत वैद्यकीय उपचार मिळाले असून अनेकांचे प्राण वाचले आहेत. विशेष म्हणजे, प्रसूतीसाठी रुग्णालयात नेत असताना ६११ बाळांचा जन्म थेट रुग्णवाहिकेतच झाला आहे.
महाराष्ट्र अत्यावश्यक वैद्यकीय सेवा विभागाअंतर्गत चालणाऱ्या ‘१०८’ रुग्णवाहिकेचा उपयोग अपघातग्रस्त, भाजलेले रुग्ण, हृदयरुग्ण, गंभीर जखमी, विषबाधा झालेले रुग्ण, आपत्तीग्रस्त नागरिक, गर्भवती महिला तसेच आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींना मोठ्या प्रमाणावर झाला आहे. रायगडसारख्या भौगोलिकदृष्ट्या विस्तीर्ण आणि काही भागांत दुर्गम असलेल्या जिल्ह्यात ही सेवा अत्यंत महत्त्वाची ठरली आहे.
रायगड जिल्ह्यात सध्या ‘१०८’ क्रमांकाच्या एकूण २३ रुग्णवाहिका कार्यरत आहेत. यामध्ये ४ ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट आणि १९ बेसिक लाईफ सपोर्ट रुग्णवाहिकांचा समावेश आहे. अपघातांमध्ये जखमी झालेल्या ८ हजार ४०९ रुग्णांना ‘१०८’ रुग्णवाहिकेमधून रुग्णालयात दाखल करण्यात आले. भांडण-तंटे किंवा हल्ल्यांमध्ये जखमी झालेल्या १ हजार ८ जणांना उपचार मिळाले. आगीच्या घटनांमध्ये भाजलेल्या ९०२ रुग्णांना, तर हृदयविकाराने त्रस्त २ हजार २३५ रुग्णांना तातडीची मदत देण्यात आली. विषबाधा झालेल्या ५ हजार ९४ रुग्णांना तसेच प्रसूतीसाठी २४ हजार ६५४ महिलांना या सेवेचा लाभ झाला आहे. याशिवाय, पॉली ट्रॉमा झालेल्या ६ हजार २६४ आणि आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या १४१ नागरिकांचे प्राण वाचवण्यातही ‘१०८’ रुग्णवाहिकेने मोलाची भूमिका बजावली आहे.
..................
बोट ॲम्ब्युलन्सचीही आवश्यकता
‘१०८’ रुग्णवाहिका ही मोफत सेवा असून, वेळेवर उपचार मिळवून देण्यात ती अत्यंत यशस्वी ठरत आहे. मात्र, वाढती लोकसंख्या आणि आपत्कालीन घटनांचा विचार करता आणखी रुग्णवाहिकांची गरज आहे. तसेच गंभीर रुग्णांना तातडीने मुंबईतील उच्चस्तरीय उपचारांसाठी नेण्यासाठी बोट ॲम्ब्युलन्सचीही आवश्यकता आहे, असे इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसचे जिल्हा व्यवस्थापक जीवन काटकर यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.