नाती-गोती मैदानात...
उमेदवारी जाहीर होण्याआधीच इच्छुकांचा घराघरात प्रचार
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २३ ः कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अजून जाहीर झालेली नसली, तरी इच्छुक उमेदवारांनी प्रचार यंत्रणा मात्र कामाला लावली आहे. विशेष म्हणजे या वेळी प्रचाराचे प्रमुख दावेदार ठरत आहेत सगेसोयरे आणि भावकी. नातेसंबंधांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन ओळख करून देत मतदारांपर्यंत पोहोचण्याची रणनीती आखली जात आहे.
सामाजिक माध्यमांवरील प्रचार प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचत नाही, हे लक्षात घेऊन इच्छुकांनी थेट डोअर टू डोअर मोहिमेला सुरुवात केली आहे. उमेदवारी मिळाल्यानंतर प्रचारासाठी कमी कालावधी मिळत असल्यामुळे त्याआधीच इच्छुक उमेदवार घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत, तर पत्नी, तिचे भाऊ, नातेवाईक, जवळचे परिचित यांना प्रचारात उतरवत आपला माणूस अशी ओळख निर्माण करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे अनेक प्रभागांमध्ये सकाळ-संध्याकाळ भावकीचे वेगवेगळे गट प्रचारात दिसू लागले आहेत.
डोंबिवली व कल्याणमधील काही प्रभागांत तर काका-पुतणे, भावजय-जावा यांच्यात निवडणुकीपूर्वीच प्रचारानिमित्ताने लढती रंगल्या आहेत. पक्षाने अधिकृत उमेदवारी जाहीर केलेली नसतानाही सुरू झालेल्या या प्रचारामुळे मतदार आश्चर्य व्यक्त करत आहेत. मागील पाच वर्षांत न दिसलेले इच्छुक अचानक दारात येऊ लागल्याने नागरिकांमध्ये कुजबुज सुरू आहे.
दरम्यान, काही आक्रमक मतदार इच्छुकांना नागरी समस्या, रखडलेली विकासकामे यावरून जाब विचारत आहेत. याला उत्तरे देताना इच्छुकांचा मात्र घाम निघत आहे. चार सदस्यीय प्रभाग पद्धतीत आपले स्थान पक्के करण्यासाठी काही ठिकाणी आचारसंहिता लागू होण्यापूर्वी साडीवाटप, मेडिकल किट, कॅलेंडरवाटप झाल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.
राजकीय उलथापालथीही या पार्श्वभूमीवर सुरूच आहेत. काही इच्छुकांनी शिवसेना (शिंदे गट), मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केला असून, एकाच प्रभागातून भाजपकडून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू आहे. मात्र, पूर्ववैमनस्यामुळे हे नवे सहकारी एकमेकांकडे पाहायलाही तयार नसल्याची चर्चा आहे. परिणामी प्रचारात कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची कोंडी होत असून, पक्षांतर्गत रुसवे–फुगवे उघड होत आहेत. वेळीच पक्षनेतृत्वाने या ताणतणावात हस्तक्षेप केला नाही, तर हाती येणारा विजय घालवावा लागू शकतो, अशी दबक्या आवाजात चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे. कल्याण-डोंबिवलीत सध्या निवडणूक अजून दूर असली तरी राजकीय रणधुमाळी मात्र जोरात सुरू झाल्याचे चित्र आहे.
घराणेशाहीवर जोर
कल्याण-डोंबिवलीत अनेक माजी लोकप्रतिनिधी पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरण्यास सज्ज झाले आहेत. काहींनी आपल्या मुलांना, पत्नीला निवडणुकीत नव्याने उतरवले आहे. तर काहीजण आई, भाऊ, वहिनी, पुतण्या, पत्नी यांच्या तिकिटासाठी जोर लावताना दिसत आहेत. यामुळे घराणेशाहीला नेत्यांकडूनच पाठबळ दिले जात असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. अंबरनाथ बदलापूर येथे घराणेशाहीला फटका बसल्याचे दिसून आल्यानंतर आता कल्याण-डोंबिवलीमध्ये घराणेशाहीला पाठबळ दिले जाते की ही मक्तेदारी मोडीत काढली जाते, हे पहावे लागेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.