जेएनपीएत प्रदूषण नियंत्रणासाठी प्रभावी पावले
धूळ प्रदूषण रोखण्यासाठी पाण्याचे फवारे; कर्मचारी, नागरिकांना दिलासा
उरण, ता. २३ (वार्ताहर) : नवी मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण (जेएनपीए) परिसरात वाढत्या वायू व धूळ प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाने ठोस, नियोजनबद्ध आणि पर्यावरणपूरक उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. बंदर परिसरात सातत्याने सुरू असलेली मालवाहतूक, कंटेनर हाताळणी तसेच अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणावरील वर्दळ यामुळे हवेत मोठ्या प्रमाणात धूळ उडत होती. या समस्येवर प्रभावी उपाय म्हणून जेएनपीए प्रशासनाने वॉटर स्प्रिंकलर सिस्टीमचा व्यापक वापर सुरू केला आहे.
जेएनपीएच्या अंतर्गत रस्ते, कंटेनर यार्ड, गोदाम परिसर तसेच मालवाहतुकीच्या मुख्य मार्गांवर नियमित अंतराने पाण्याचे फवारे मारले जात आहेत. यामुळे हवेत उडणारी धूळ जमिनीवर बसत असून, वायू प्रदूषणाचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होत असल्याचे दिसून येत आहे. विशेषतः उन्हाळ्यात व कोरड्या हवामानात धूळ प्रदूषण अधिक तीव्र होत असल्याने ही उपाययोजना अधिक परिणामकारक ठरत आहे.
केवळ पाण्याच्या फवाऱ्यांपुरतेच न थांबता जेएनपीए प्रशासनाने पर्यावरण संरक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. हरित पट्टा वाढविणे, मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड, रस्त्यांची नियमित स्वच्छता, यांत्रिक स्वीपिंग मशिन्सचा वापर तसेच प्रदूषण नियंत्रण मानकांचे काटेकोर पालन करण्यावर भर देण्यात येत आहे. बंदर परिसरातील विविध टर्मिनल ऑपरेटर व कंत्राटदारांनाही प्रदूषण नियंत्रणासाठी ठोस सूचना देण्यात आल्या आहेत.
या उपक्रमांचा थेट फायदा जेएनपीए परिसरात कार्यरत कर्मचारी, वाहनचालक तसेच आसपासच्या उरण तालुक्यातील नागरिकांना होत आहे. धूळ प्रदूषणामुळे होणारे श्वसनाचे त्रास, डोळ्यांची जळजळ व आरोग्यविषयक तक्रारी कमी झाल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
पर्यावरण संतुलन राखत बंदर विकास साधण्याचा जेएनपीएचा संकल्प असून, भविष्यात आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्रदूषण नियंत्रणासाठी आणखी प्रभावी उपाय राबविले जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. विकासासोबत पर्यावरण संरक्षणाचा समतोल साधण्याचा आदर्श जेएनपीए परिसरात निर्माण होत असल्याचे चित्र दिसत आहे.
चौकट
आरोग्यदायी उपक्रम
धूळ प्रदूषण नियंत्रणासाठी सुरू केलेल्या वॉटर स्प्रिंकलर सिस्टीममुळे जेएनपीए परिसरातील हवेची गुणवत्ता सुधारत असून, आरोग्याच्या दृष्टीने हा उपक्रम दीर्घकालीन लाभदायक ठरणार असल्याचा विश्वास पर्यावरणतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.