बदलापूर, ता. २३ (बातमीदार) : योगेश भोईर यांचे डिपॉझिट जप्त होईल, अशा वल्गना करणारेच उमेदवार ‘काठावर पास झाले आणि तेही अभ्यासाविना’, असा टोला आमदार किसन कथोरे यांनी विरोधकांना लगावला आहे. ऐन वेळी आपल्यातील काही जणांनी गद्दारी केली, त्यामुळे हे घडले, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.
कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुकांचा निकाल २१ डिसेंबरला जाहीर होताच बदलापूरकरांनी भाजप-राष्ट्रवादी युतीला सत्तेचा स्पष्ट कौल दिला. युतीचे एकूण २५ नगरसेवक तसेच नगराध्यक्ष निवडून आल्यानंतर, सर्व विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यासाठी स्थानिक आमदार किसन कथोरे यांच्या कार्यालयात भव्य सत्कार सोहळा घेण्यात आला. या सोहळ्याची विशेष बाब म्हणजे केवळ विजयी उमेदवारच नव्हे, तर अत्यंत अटीतटीच्या लढतीत अवघ्या ३२ मतांनी पराभव पत्करावा लागलेल्या उमेदवार योगेश भोईर यांचाही सन्मान करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस आशीष दामले, भाजप गटनेते राजेंद्र घोरपडे, नवनिर्वाचित नगराध्यक्ष रुचिता घोरपडे यांच्यासह युतीचे विजयी व पराभूत उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नगराध्यक्षपदासाठी अपेक्षित असलेली लीड कमी राहिल्यामुळे काही प्रभागांत नगरसेवक पदावर परिणाम झाला. विरोधकांनी प्रचारादरम्यान मोठ्या प्रमाणात दिशाभूल केली. नगरसेवक पदासाठी ८२ हजारांहून अधिक मते मिळाली; मात्र अपेक्षेपेक्षा २२ हजार मतांचा फरक जाणवला, असे कथोरे म्हणाले. मुख्यमंत्री बदलापुरात प्रचार सभेसाठी आले असताना एकही नागरिक सभा अर्धवट सोडून गेला नाही, याचे विशेष कौतुक मुख्यमंत्र्यांनी केल्याचे आमदार कथोरे यांनी सांगितले. जनगणना पूर्ण झाल्यानंतर बदलापूरला महापालिकेचा दर्जा देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा लक्षात घेता, आतापासूनच तयारीला लागण्याचे आवाहनही त्यांनी केले.
मुख्यमंत्र्यांच्या सभेने बदलले वातावरण
अंबरनाथ शहरातील निवडणुकीबाबत बोलताना आमदार कथोरे म्हणाले, नगराध्यक्षपदासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागली आणि अवघ्या पाच दिवसांत संपूर्ण वातावरण पालटले. बालाजी नगरमध्ये पहिला दणका देत, यापूर्वी कधीही न झालेली विरोधी पक्षाची सभा घेण्याचा निर्णय झाला. सुरुवातीला परिस्थिती प्रतिकूल असल्याने मुख्यमंत्री साशंक होते; मात्र आग्रहानंतर त्यांनी सभा घेण्यास होकार दिला. नागरिकांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून सभेची वेळ दुपारी तीनऐवजी सायंकाळी सात करण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर वातावरण बदलले आणि अखेर विजय मिळाला, असे आमदारांनी सांगितले. अंबरनाथमध्ये चार महिन्यांत मेट्रो सुरू करण्याची घोषणा तसेच अंबरनाथ–बदलापूर या दोन्ही शहरांसाठी भरघोस निधी व वैयक्तिक लक्ष देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.