टेकफेस्टला उत्स्फूर्त प्रतिसाद
रोबोट्स आणि इतर तंत्रज्ञान बच्चेकंपनीच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : तंत्रज्ञानाचा उत्सव म्हणून प्रसिद्ध असलेल्या आयआयटी मुंबईतील टेकफेस्टमधील दुसऱ्या दिवशी मुंबई आणि परिसरातील शाळांमधील बच्चेकंपनीने येथे देश-विदेशातून आलेल्या रोबोट्स आणि इतर तंत्रज्ञानाचा मनमोकळेपणाने आनंद लुटला.
दुसऱ्या दिवशी शालेय विद्यार्थ्यांनी टेकफेस्टला मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. यामध्ये पहिली ते बारावीपर्यंतच्या मुलांचा समावेश होता. तसेच तंत्रज्ञानाचे शिक्षण घेणाऱ्या मुंबई आणि महाराष्ट्रातील अनेक अभियांत्रिक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीही या टेकफेस्टला भेट देऊन जगभरातील विविध संस्था आणि कंपन्यांनी सादर केलेल्या विविध तंत्रज्ञानाला समजून घेण्याचा प्रयत्न केला.
यंदाच्या टेकफेस्टमध्ये पहिल्यांदाच कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि रोबोटिक नवोपक्रमाच्या प्रदर्शनात सहाहून अधिक मानवी रूपी रोबोट्स एकाच मंचावर अवतरले आहेत. या रोबोट्सला पाहण्यासाठी बच्चेकंपनीपासून तंत्रज्ञानाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. पहिल्यांदाच अशा प्रकारचे रोबोट्स एकत्र लावण्यात आले असून, यामध्ये जगभरातील तंत्रज्ञानाच्या एका वेगळ्या विकासाची झलक यामध्ये दिसून येते.
प्रत्येक मानवी रूपी रोबोट हा अनेक वर्षांच्या महत्त्वपूर्ण संशोधनाचा आणि तांत्रिक उत्क्रांतीचा परिणाम आहे. या सर्वांनी मिळून एका अभूतपूर्व सोहळ्याचे सादरीकरण येथे करण्यात आले आहे.
यंदा अनेक मानवी रूपी रोबोट्स सादर करण्यात आले असून, त्यांनी विद्यार्थ्यांचे विशेष लक्ष वेधून घेतले. यासोबतच संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) अंतर्गत डिफेन्स इन्स्टिट्युट ऑफ सायकॉलॉजीकल रिसर्च या संस्थेने भारतीय हवाई दलात वापरल्या जाणाऱ्या प्रायोगिक मानसशास्त्रीय मूल्यांकन प्रणालींचे प्रदर्शन केले. आयआयटी मुंबईने विकसित केलेले आणि ठाणे महानगरपालिकेने अमलात आणलेले कचरा व्यवस्थापनाशी संबंधित प्रकल्पही या प्रदर्शनात मांडण्यात आले होते.
संरक्षण आणि रोबोटिक्स
यंदाच्या टेकफेस्टमधील प्रमुख आकर्षणांमध्ये संरक्षण, रोबोटिक्स आणि अंतराळ तंत्रज्ञानाचे प्रदर्शन ठरले आहे. आयआयटी मुंबईचे विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी विकसित केलेले प्रकल्प राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सहभागींनी सादर केलेल्या प्रकल्पांसोबत प्रदर्शित करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.