भरधाव रिक्षाची स्कुटीला धडक
कासा, ता.२४ (बातमीदार): कासा-चारोटी मार्गावर चारोटीहून रोतीच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव रिक्षाने स्कुटीला जोरदार धडक दिली. या अपघातात स्कुटीवरील प्रवास करणाऱ्या सोनाली तायडे (वय ३४), त्यांची मुलगी ब्राह्मी शिवकुमार मौर्य (वय ९) गंभीर जखमी आहेत.
कासाहून चारोटीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनाला मागे टाकण्याच्या नादात भरधाव रिक्षाने स्कुटीला धडक दिली. या अपघातात सोनाली तायडे यांच्या हाताला, डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तर मुलीच्या पायाला दुखापत झाली आहे. घटनेनंतर रिक्षा चालक घटनास्थळावरून पळून गेला आहे.
तर जखमींवर वापी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे कासा बाजारपेठ परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे स्थानिक पोलिस, ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.