२०२५ प्रकल्प पूर्ती आणि प्रारंभीचे!
विजय सिंघल : नवी मुंबईच्या आकाशात आज महत्त्वाकांक्षी उड्डाण
सुजित गायकवाड
नवी मुंबई, ता. २३ : कोविडमुळे रुतलेल्या विकासाच्या चाकांना २०२३ नंतर वेग मिळाला. परंतु २०२५ हे वर्ष सिडकोकरिता प्रकल्पांची पूर्ती करणारे ठरले. २०१८ ते २०२५ या वर्षांत सिडकोने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासारखे शिवधनुष्य लीलया पेलले. आज २५ डिसेंबरला नवी मुंबईच्या आकाशात पहिले विमान झेपावणार आहे. या पहिल्या विमानाचे स्वप्न कित्येक वर्षे पाहिले गेले होते. या विमानाच्या उड्डाणासोबत नवी मुंबई शहराची विकासाची दारेदेखील उघडली आहेत. विमानतळामुळे शहरात सुमारे ७० हजार कोटींची कामे सुरू असून, नवी मुंबईसहित एमएमआर परिक्षेत्राचा नव्या वर्षात कायापालट होणार आहे. यानिमित्ताने सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी गेल्या वर्षाचा धांडोळा घेत या वर्षाला ‘प्रकल्प पूर्ती आणि प्रारंभी’चे नाव दिले.
देशातील सर्वात मोठे ग्रीनफिल्ड आणि लंडनच्या हीथ्रो विमानतळाशी बरोबरी करणारे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होण्यापूर्वीच अनेक विक्रम त्याने नावावर केले आहेत. २५ डिसेंबरच्या दिवशी या विमानतळाहून तब्बल ३० विमाने आकाशात झेपवणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१८ला या विमानतळाच्या कामाचे भूमिपूजन केले होते. त्यानंतर सिडको आणि नियुक्त केलेल्या अदाणी समूहाने विमानतळाचे काम वेगाने केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या मुदतीमध्ये काम पूर्ण करून नवी मुंबईकरांनी पाहिलेले चार दशकांपूर्वीचे स्वप्न आज अस्तित्वात येत आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्राच्या जीडीपीमध्ये मोठी भर पडणार आहे. हे विमानतळ नवी मुंबईपुरतेच मर्यादित न राहता पश्चिम मुंबईपासून कल्याण, डोंबिवली, पालघर, विरारपासून अगदी पुण्यातील बाणेर, वाकडपर्यंतच्या लोकांना फायद्याचे ठरणार आहे. गेली दोन वर्षे सिडकोने चांगला वेग धारण करीत विमानतळाचे काम २०२५ला पूर्ण केले. नवी मुंबई विमानतळावरील एका धावपट्टीवर एका वर्षाला नऊ कोटी प्रवासी क्षमता आहे. तर मुंबईच्या विमानतळावर ५५ कोटी क्षमता आहे. अशी एकूण १५ कोटी प्रवासी क्षमता नवी मुंबई आणि मुंबई विमानतळाहून होत आहे. जर तिसऱ्या धावपट्टी ४५ कोटी प्रवासी क्षमता आणखी वाढणार आहे.
नव्या वर्षात सरकारने काही वेगळे करण्याच्या प्रयत्नांमध्ये आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे शहर तयार करण्याचे धोरण सरकारने आखले आहे. आपल्या देशातील मुले परदेशात शिक्षण घेण्यासाठी जातात. त्यापेक्षा बाहेरच्या शैक्षणिक संस्था आपल्या देशात आणल्या तर आपल्या देशातील मुलांना परदेशी शिक्षण स्वस्तात उपलब्ध होईल. कमी खर्चात हे शिक्षण मिळणार आहे. त्यानुसार केंद्र सरकरने जे नवे शिक्षण धोरण तयार केले आहे यात परदेशातील विद्यापीठांना भारतात येण्यास वाव आहे. त्याकरिता सिडकोने १०० हेक्टरची जागा निवडली आहे. यात १० विद्यापीठे काम करू शकतात. गेल्या वर्षी दावोसला पाच विद्यापीठांसोबत करार केला आहे. त्याअनुषंगाने परदेशातील पाच विद्यापीठांनी यूजीसीने एलओआय दिला आहे. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान हे स्वतः या ठिकाणी येऊन एलओआय देऊन गेले. पाच विद्यापीठेदेखील जगभरातील पहिल्या पाचमधील विद्यापीठांसोबत पत्रव्यवहार सुरू आहे. युनिव्हर्सिटी ऑफ लंडन, किंग्ज कॉलेज, एलएससी, हार्वर्ड विद्यापीठांसोबत चर्चा सुरू आहे.
----------
पूर्णत्वास आलेली कामे
- २४ हजार कोटींचे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ
- पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत १९ हजार घरे
----------
या वर्षी सुरू झालेली कामे
- आठ हजार कोटींची नैना प्रकल्पाची कामे
- एज्युसिटीचे ८०० कोटींचे काम
- पीएमएवाय १५ हजार घरांकरिता ३० हजार कोटींचे काम
- उलवे कोस्टल रोड
- खारघर कोस्टल रोड
- तुर्भे-खारघर लिंक रोड
----------------------------------------------
सिडकोच्या घरांचे दर १० टक्क्यांनी कमी
घरांच्या किमती १० टक्क्यांनी कमी झाल्यामुळे आगामी काळातील योजनांच्या घरांच्या किमती कमी राहणार आहेत. १९ हजार घरांची लॉटरी आपण त्यानुसार काढलेली आहे. यात नवीन ५० टक्के लोकांनी घरे निवडलेली आहेत. उर्वरित घरे लॉटरीनुसार काढली जाणार आहेत. नव्या वर्षात १५ हजारांपेक्षा अधिक घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे. २०२६मध्ये १५ हजार घरे येणार आहेत.
----------------------------------------
आठ हजार कोटींच्या कामांना सुरुवात
नैना प्रकल्पाच्या कामाला सुरुवात याआधीपासून झाली आहे. आठ हजार कोटींच्या कामांना सुरुवात झाली आहे. २२५ चौरस किलो मीटर अंतरावरील ९४ गावांची जमीन संपादित केली आहे. ४२ चौरस किलो मीटरमध्ये ३२ गावांचा समावेश आहे. असे एक ते १२ विकास आराखडा तयार केला असून, मंजूर केला आहे. या सर्व भागांत मोठ्या प्रमाणात नैनादेखील याच वेगाने मार्गी लावण्यात येणार आहे. आठ हजार कोटींचे रस्तेकाम सुरू करण्यात आले आहे.
--------------------------------------------------
तरघर रेल्वेस्थानक
नवी मुंबई विमानतळाच्या जवळ असल्याच्या अनुषंगाने सर्वात महत्त्वाचे म्हणून तरघर रेल्वेस्थानकाकडे पाहिले जाते. याच वर्षी सिडकोने या रेल्वेस्थानकाचे काम पूर्ण केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या स्थानकाचे उद्घाटन केले. या रेल्वेस्थानकावर प्रशासनाला ११२ कोटींचा खर्च आला. या रेल्वेस्थानकापासून विमानतळाकडे जाण्यासाठी बस व्यवस्था करण्यात आली आहे.
-----------------------------------------------
गोल्फ कोर्स
खारघर शहरात पांडवकडा धबधब्याच्या पायथ्याशी वसलेल्या जागेत सिडकोने गोल्फ कोर्स तयार केले होते; मात्र हे नऊ होल्सचे असल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्पर्धा या ठिकाणी भरवल्या जात नव्हत्या. अखेर सिडकोने या गोल्फ कोर्समध्ये नूतनीकरण करून आता १८ होल्स आणि पार ७२ असे आंतरराष्ट्रीय स्तरानुसार तयार केले आहे. याचे बांधकाम पूर्ण झाले असून, सिडकोने यावर १०९ कोटी रुपये खर्च केले आहेत. या ठिकाणी सध्या राष्ट्रीय स्तरावरील सिडको ओपन्स ही स्पर्धा खेळवली जात आहे.
----------------------------------------------
नेरूळ जेट्टी
आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोड म्हणून सिडकोने निर्माण केलेली नेरूळ येथील जेट्टी अखेर या वर्षापासून सुरू झाली आहे. या भागातून भाऊचा धक्का आणि घारापुरी (एलिफंटा) या ठिकाणी बोटसेवा सुरू केली आहे. दिवसभरात चार फेऱ्या भाऊच्या धक्क्यापर्यंत दिल्या जात आहेत. या जेट्टीवर सिडकोने १४८ कोटी रुपये खर्च केला आहे.
---------------------------------------------------
देशाच्या जीडीपीस हातभार लावणारे नवी मुंबई शहर हे एमएमआर परिसरातील महत्त्वाचे शहर आहे. आगामी काळात मुंबई व दिल्लीपेक्षा नवी मुंबईचे आर्थिक महत्त्व अधिक वाढणार आहे. विविध प्रकारच्या गुंतवणुकींचे हब नवी मुंबई शहर होणार आहे.
- विजय सिंघल, व्यवस्थापकीय संचालक, सिडको
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.