कीर्तनातून उलगडला स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास
ह. भ. प. डॉ. चारुदत्त आफळे यांच्या कीर्तनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
वज्रेश्वरी, ता. २६ (बातमीदार) : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांचा त्याग, शौर्य आणि राष्ट्रनिष्ठा याबाबत प्रेरणा देणारे राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. डॉ. चारुदत्त आफळे यांचे उद्बोधक कीर्तन झाले. वसई तालुक्यातील पूज्य साने गुरुजी प्रशिक्षण संकुल, श्रमजीवी संघटनेच्या कार्यालय परिसरात एकाच वेळी बाल कला-क्रीडा मेळावा आणि भक्तिभावपूर्ण कीर्तन आज उल्हासदायक वातावरणात झाले.
श्रमजीवी संघटना व सकाळ माध्यम समूह यांच्या संयुक्त विद्यमाने, सकाळ भक्ती शक्ती व्यासपीठ अंतर्गत आयोजित कीर्तनात ह. भ. प. चारुदत्त आफळे यांनी इंग्रजांच्या दडपशाहीखाली असलेल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्यांनी सशस्त्र लढा उभारला, अशा सर्व क्रांतिकारकांना अभंगांच्या माध्यमातून भावपूर्ण आदरांजली वाहिली.
डॉ. चारुदत्त आफळे म्हणाले की, “भगवान श्रीकृष्णांकडेही सैनिक होते. मात्र, ते राजदरबारी सैनिक नव्हते, तर गाई वळणारे, दूध-दही विकणारे, गोवर्धन परिसरातील जंगलांची राखण करणारे आणि कृष्णाबरोबर नाचत-गात उभे राहणारे सामान्य लोकच खरे त्यांचे सैनिक होते. हेच सैनिक श्रमजीवीचे सैनिक होते,” असे उद्गार त्यांनी काढले. त्यांच्या या विचारांनी उपस्थितांमध्ये मोठा प्रतिसाद मिळाला.
१८५७ ते १९४७ या कालखंडातील सहस्रावधी क्रांतिकारकांपैकी काही निवडक क्रांतिवीरांच्या उठावांची व त्यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटनांची माहिती आफळे यांनी अभंगांच्या माध्यमातून मांडली. या कीर्तनातून महाराष्ट्र व देशातील अन्यायाविरुद्ध उठाव करणारे वासुदेव बळवंत फडके, मल्लविद्येचे प्रसारक वीर लहुजी वस्ताद साळवे, बंकिमचंद्र चटर्जी, स्वातंत्र्यवीर सावरकर आदी क्रांतिवीरांचा त्याग, बलिदान व राष्ट्रप्रेम प्रभावीपणे उलगडण्यात आले.
याप्रसंगी आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष व श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांच्या हस्ते ह. भ. प. डॉ. चारुदत्त आफळे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला. तसेच या कीर्तनाच्या आयोजनासाठी सहकार्य केल्याबद्दल सकाळ माध्यम समूहातील सर्वांचे त्यांनी विशेष आभार मानले.
या कार्यक्रमास आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष व श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित, ज्येष्ठ पत्रकार रामकृष्णन अय्यर, वसईच्या माजी तहसीलदार योगिनी सुर्वे, श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा, संघटनेचे उपाध्यक्ष केशव नानकर, सकाळ भक्ती शक्ती व्यासपीठाचे संपादक अंकित काणे, सकाळ कम्युनिटी डेव्हलपमेंटचे मुख्य व्यवस्थापक दिनकर कोकितकर, पालघर जिल्हा प्रतिनिधी देवाशिष वैद्य यांच्यासह श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी, समर्थन संस्थेचे प्रतिनिधी, कार्यकर्ते, वारकरी, युवक-युवती व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांचा इतिहास भक्ती व राष्ट्रप्रेमाच्या माध्यमातून मांडणारे हे कीर्तन वारकरी संप्रदायासह सर्व श्रमजीवीच्या मुलांसाठी कार्यकर्त्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरले. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारक विषयावरील कीर्तन आयोजनाची प्रमुख जबाबदारी श्रमजीवी संघटनेचे ह. भ. प. पंढरीनाथ महाराज यांनी यशस्वीपणे पार पाडली, तर कार्यक्रमाचे आभार संघटनेच्या संघटक सचिव सीता घाटाळ यांनी मानले.
या कीर्तनाला वारकरी, नागरिक, युवक-युवती, लहान मुले तसेच विविध भजन मंडळांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकीकडे श्रमजीवी संघटना व विधायक संसद आयोजित क्रीडा स्पर्धा व कला-क्रीडा मेळावा सुरू असताना, दुसरीकडे हे क्रांतिकारकांवरील कीर्तन सुरू होते. दोन्ही उपक्रमांना मुले, तरुण व शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कीर्तनातून स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास भक्तीपर परंपरेशी जोडत राष्ट्रभक्तीचा जागर करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.