मुंबईत फक्त एक लाख ६८ हजार ३५० दुबार मतदार
११ लाख नावांची तपासणी; पालिकेचे तंत्रज्ञानाधारित मॉडेल यशस्वी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दुबार मतदारांच्या छाननीत अखेर एक लाख ६८ हजार ३५० मतदार प्रत्यक्षात दुबार असल्याचे निष्पन्न झाले आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून प्राप्त यादीनुसार सुरुवातीला ११ लाख एक हजार ५०७ दुबार मतदारांची नोंद होती; मात्र मुंबई महापालिकेने तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत केलेल्या सखोल तपासणीतून दुबार मतदारांची नावे पडताळली.
दुबार मतदारांची मोठी आकडेवारी पारंपरिक (मॅन्युअल) पद्धतीने तपासली असती, तर किमान तीन ते चार महिने लागले असते; मात्र महापालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने तसेच एफ उत्तर व एन विभागाने संयुक्तपणे राबवलेल्या प्रायोगिक उपाययोजनांमुळे दुबार मतदार शोधण्याचे ‘डेस्क वर्क’ अवघ्या तीन ते चार तासांत पूर्ण करण्यात आले. या प्रक्रियेसाठी माहिती तंत्रज्ञान विभागाने विकसित केलेले Election Data Extraction Software वापरण्यात आले. या सॉफ्टवेअरच्या सहाय्याने Excel Formula वापरून एकाच वॉर्डमध्ये दोन किंवा अधिक वेळा नोंद असलेल्या मतदारांची स्वतंत्र यादी, तसेच एकापेक्षा अधिक वॉर्डमध्ये नोंद असलेल्या मतदारांची स्वतंत्र यादी तयार करण्यात आली. या प्राथमिक छाननीनुसार, एकाच वॉर्डमधील दुबार नावे दोन लाख २५ हजार ५७२, तर एकापेक्षा अधिक वॉर्डमधील नावे आठ लाख ७५ हजार ९३५ इतकी होती. यानंतर प्रत्येक वॉर्डनिहाय सखोल पडताळणी करण्यात आली. या तपासणीनंतर दुबार मतदार निश्चित करण्यात आले असून, त्यांच्याबाबत गृहभेटी घेऊन प्रत्यक्ष पडताळणीही करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रक्रियेचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाला सादर करण्यात आला असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.
तंत्रज्ञानाधारित मॉडेलचे कौतुक
दुबार मतदार शोधण्यासाठी महापालिकेने राबवलेल्या या तंत्रज्ञानाधारित मॉडेलचे राज्य निवडणूक आयोगाकडून विशेष कौतुक करण्यात आले आहे. तसेच अकोला, छत्रपती संभाजीनगर, अमरावती यांसह अनेक महापालिकांनी या सॉफ्टवेअरची व कार्यपद्धतीची माहिती मागवली असून, पालिकेचा हा उपक्रम राज्यातील इतर महापालिकांसाठी मार्गदर्शक ठरत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
१५ टक्के दुबार मतदार
महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी थेट १,२६,६१६ घरांना भेट देऊन पडताळणी केली. यापैकी ४८,३२८ मतदारांनी फॉर्म ‘अ’ सादर केला. या फॉर्ममध्ये, दुबार मतदारांनी एकाच प्रभागात मतदान करण्याची इच्छा दर्शविली. राज्य निवडणूक आयोगाने सादर केलेल्या यादीत फक्त १५ टक्के दुबार मतदार आढळल्याचे पालिकेने नोंदवले आहे. एकूण दुबार मतदारांच्या १०० टक्के पडताळणी करण्यात आली आहे. एल वॉर्ड, के पश्चिम वॉर्ड आणि आर सेंट्रल वॉर्डमध्ये सर्वाधिक दुबार मतदार आढळले.
नावापुढे आता स्टार
मुंबईतील एका वॉर्डमध्ये तीन ते चार वेळा दुबार मतदारांची ओळख पटवण्यात आली आहे. त्यामुळे जे दुबार मतदार नाहीत, त्यांच्या नावांपुढील डबल स्टार काढून टाकले जातील. जे प्रत्यक्षात दुबार मतदार आहेत, त्यांच्या नावापुढील डबल स्टार कायम ठेवले जाणार आहेत. मतदान करताना त्यांच्याकडून एकाच मतदान केंद्रावर मतदान करण्याचे हमीपत्र लिहून घेतले जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.