नवी मुंबई, ता. २७ (वार्ताहर) : सीवूड्स येथील करावे गावात राहणाऱ्या ३४ वर्षीय व्यक्तीने शेजारील नऊ वर्षांच्या मुलीसोबत अश्लील व लैंगिक चाळे केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्रवतकुमार हेमंत पैक (वय ३४) याच्याविरोधात एनआरआय पोलिसांनी विनयभंग, तसेच पोक्सो कलमानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
प्रवतकुमार हा करावे गावात राहण्यास असून नऊ वर्षीय पीडित मुलगी त्याच्या शेजारी राहण्यास आहे. त्यामुळे त्याचे पीडित मुलीच्या घरी नियमित येणे-जाणे होते. बुधवारी (ता. २४) पीडितेची आई आतल्या घरामध्ये काम करत होती. मुलगी हॉलमध्ये एकटीच टीव्ही पाहत बसली होती. त्या वेळी प्रवतकुमारने त्यांच्या घरामध्ये प्रवेश करून पीडितेसोबत अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केला. या प्रकाराची माहिती पीडितेने आपल्या आईला दिल्यानंतर तिने एनआरआय पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.