कल्याण तालुका पोलिसांची धडाकेबाज कामगिरी
११ लाखांच्या चोरीतील आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक
टिटवाळा, ता. २७ (वार्ताहर) : समृद्धी महामार्गावर उभ्या असलेल्या डंपरमधून ११ लाख रुपयांची रोकड चोरून फरार झालेल्या आरोपीचा कल्याण तालुका पोलिसांनी छडा लावला आहे. पोलिसांनी थेट उत्तर प्रदेशमधून मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या असून, त्याच्याकडून चोरीतील सात लाखांची रोकड हस्तगत करण्यात आले आहेत.
दिनेशकुमार यादव हे एका बेस ऑइल पुरवठा करणाऱ्या कंपनीत सुपरवायझर आहेत. १७ डिसेंबर रोजी ते कंपनीचे ११ लाख रुपये घेऊन डंपरने मुंबईच्या दिशेने येत होते. निंबवली गावाजवळ टोल नाक्यापाशी यादव चहा पिण्यासाठी खाली उतरले असता पैशांची पिशवी चालकाच्या सीटच्या मागे ठेवली होती. हीच संधी साधून आरोपी मकसूद अक्तर हुसैन आणि अरमान खान यांनी ती पिशवी लंपास केली. याप्रकराणी तक्रार दाखल होताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. तांत्रिक विश्लेषणाद्वारे मुख्य आरोपी मकसूद अक्तर हुसैन हा उत्तर प्रदेशातील संतकबीरनगर जिल्ह्यातील दुधारा येथे असल्याची माहिती मिळाली. पोलिस पथकाने तातडीने उत्तर प्रदेश गाठत मकसूदला ताब्यात घेतले. तर, सात लाखांची रोकडही जप्त केली. या प्रकरणातील दुसरा आरोपी अरमान खान याचा शोध अद्याप सुरू असून, उर्वरित रक्कमही लवकरच हस्तगत केली जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. कल्याण तालुका पोलिसांच्या या कामगिरीमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.